फ्लॅटखरेदीचे सर्व सोपस्कार पार पाडूनही मुलुंड येथील रहिवाशाला गेल्या १३ वर्षांपासून फ्लॅट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरला ग्राहक मंचाने दणका देत तयार फ्लॅटसह नुकसानभरपाई म्हणून साडेबारा लाख रुपये देण्याचे आदेश दिले खरे. परंतु या तक्रारदाराला अंधारात ठेवून बिल्डरने त्यांचा फ्लॅट ज्या दाम्पत्याला विकला त्यांना तेथून हटविण्याचे आदेश देण्याची मागणी आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यामुळे न्याय मिळाला पण.., अशी अवस्था या दाम्पत्याची झाली आहे.
रश्मी पाटील यांनी ‘अन्नापी कन्स्ट्रक्शन कंपनी’तर्फे मुलुंड येथे बांधण्यात येणाऱ्या भक्ती धाम कॉम्प्लेक्समध्ये १९९९ मध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यानंतर एक वर्षांने फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन त्यांना बिल्डरने दिले. करारानुसार डिसेंबर २००० मध्ये त्यांना फ्लॅटचा ताबा मिळणे अपेक्षित होते. १ डिसेंबर २००० रोजी पाटील यांना बिल्डरच्या कार्यालयातून उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी संपर्क साधण्यात आला. पाटील यांनी लगेचच उर्वरित रक्कम जमा केली. मात्र फ्लॅटचे सगळे पैसे जमा करूनही बिल्डरकडून त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. वारंवार त्याबाबत मागणी करूनही बिल्डरकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर कंटाळून पाटील यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. फ्लॅटचा ताबा देण्याचे, २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आणि त्यांचा फ्लॅट ज्या दाम्पत्याला बिल्डरने विकला त्यांना तेथून हटविण्याचे आदेश देण्याची मागणी केली.
ग्राहक न्यायालयाने कंपनीला सेवेत कुचराई केल्याप्रकरणी तसेच पूर्ण रक्कम भरूनही संबंधित फ्लॅटचा ताबा पाटील यांना न देता तो तिसऱ्याच कुणाला तरी विकल्याप्रकरणी दोषी ठरवले. फ्लॅट खरेदी आणि त्याबाबतच्या सर्व व्यवहारांची कागदपत्रे पाटील यांनी ग्राहक मंचासमोर सादर केली होती. त्या आधारे न्यायालयाने कंपनीला दोषी धरले आणि पाटील यांना नुकसान भरपाई म्हणून १२.५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. शिवाय पाटील यांना कायदेशीर लढाईसाठी आलेला खर्च म्हणून २५ हजार रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश दिले. ही रक्कम एका महिन्याच्या आत देण्यात आली नाही तर त्यावर १० टक्के व्याज लागू होईल, असेही मंचाने स्पष्ट केले. या वेळी मंचाने ही बाब आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे नमूद करीत संबंधित दाम्पत्याला फ्लॅटमधून हटविण्याचे आदेश देण्याची मागणी फेटाळून लावली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
न्याय मिळाला पण..
फ्लॅटखरेदीचे सर्व सोपस्कार पार पाडूनही मुलुंड येथील रहिवाशाला गेल्या १३ वर्षांपासून फ्लॅट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरला ग्राहक मंचाने दणका
First published on: 17-01-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court gave the justice but