शहराचा प्रारूप विकास आराखडा बनविण्याच्या कामात बांधकाम व्यावसायिकांकडून चाललेल्या हस्तक्षेपाची चौकशी करावी आणि संबंधित कार्यालय शक्य तितक्या लवकर महापालिका मुख्यालयात स्थलांतरीत करावे, असे निर्देश महापौरांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत दिले. या कामास आणखी सहा महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली. दुसरीकडे व्यावसायिक घरपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्ताव फेटाळण्यात आला. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी गंगापूर रस्त्यावरील जागा उपलब्ध करावी, याकरिता शिवसेनेने तर व्यवसायिकांची लुबाडणूक करणाऱ्या ‘अमुल्य’ संस्थेला दिलेला ठेका रद्द करावा, या मागणीसाठी माकपने सभागृहात गोंधळ घातला.
मंगळवारी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. प्रारूप शहर विकास आराखडय़ाच्या कामास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विषय होता. त्यावर बरीच चर्चा झाली. आराखडा बनविण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रारूप शहर विकास आराखडय़ात बिल्डरांकडून थेट हस्तक्षेप होत असून आपल्या सोईनुसार ही मंडळी त्यात फेरबदल करत असल्याचा आरोप प्रा. देवयानी फरांदे, शिवाजी सहाणे व गुरूमित बग्गा यांनी केला. त्यात महापालिकेचे अधिकारी सहभागी असल्याची तक्रार करण्यात आली. ‘एबीपीटी’ हे कार्यालय महापालिकेच्या मुख्यालयात आणावे, प्रारूप आराखडय़ाचे काम कुठपर्यंत झाले त्याची माहिती सभागृहासमोर मांडल्यावर मुदतवाढीचा विचार करावा, अशी मागणीही सदस्यांनी केली. सदस्यांचे म्हणणे जाणून घेतल्यावर महापौरांनी या कामास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या कामात बिल्डर व पालिका अधिकाऱ्यांकडून चाललेल्या फेरबदलाची चौकशी केली जाईल तसेच संबंधित कार्यालय पालिका मुख्यालयात आणण्याचे वाघ यांनी सूचित केले.
प्रशासनाने मांडलेल्या व्यावसायिक घरपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास सर्वच पक्षांच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. या प्रस्तावानुसार २० हजार वार्षिक भाडेमूल्यासाठी २६ टक्के, चाळीस हजारांसाठी २८ टक्के, चाळीस ते साठ हजार रूपये भाडेमूल्यासाठी ३० टक्के, त्यापुढे ३२ टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. मलनिस्सारण लाभकर पाच टक्के वसूल केला जातो. त्यात दुप्पट म्हणजे १० टक्के वाढीचा प्रस्ताव होता. त्यास बहुतांश सदस्यांनी विरोध केला. सदस्यांच्या भावना लक्षात घेत महापौरांनी करवाढीचा विषय फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, सभेच्या प्रारंभीच, गोंधळास सुरूवात झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी गंगापूर रस्त्यावरील इतिहास संग्रहालयालगतची जागा मिळावी म्हणून शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. सत्ताधारी मनसे त्यात आडकाठी आणत असल्याची तक्रार करत सेना पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेचे कामकाज बंद पाडण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रारंभीच गोंधळ घालण्याचा पवित्रा स्वीकारला. हे कमी म्हणून की काय, माकपच्या सदस्यांनी अमुल्य संस्थेच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडले. खुटवडनगर भागात अमुल्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेकडे दरमहा एक हजार रूपये खंडणी देण्याची मागणी केली. संबंधितांनी त्यासाठी स्थानिक नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे यांच्या नावाचा वापर केला. या पाश्र्वभूमीवर, माकपच्या पदाधिकाऱ्यांनी अमुल्य संस्थेला दिलेला ठेका पालिकेने त्वरित रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी फलकबाजीही झाल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता.