केंद्र सरकारच्या वतीने धुळे ग्रामीण मतदारसंघातील सहा ठिकाणी पर्यटन स्थळ तसेच अक्कलपाडा प्रकल्पात साहसी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. धुळे तालुक्यात विविध नावीन्यपूर्ण पर्यटन स्थळांच्या निर्मितीसाठी वाव आहे. ही स्थळे राज्यातील इतर पर्यटकांना आकर्षित करू शकतात. तसेच या पर्यटन स्थळांमुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन जिल्ह्य़ाचे वाढते तापमान कमी करण्यास मदत होऊ शकते, असे सांगत आ. शरद पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना व अर्थसंकल्पाच्या अनुदान मागण्यांवेळी मुद्दे उपस्थित केले होते. धुळे वनक्षेत्रातील पिंपरखेड येथे तोरणमाळप्रमाणे वनसृष्टी असल्याने औषधी वनस्पती उद्यानासह, बोटिंग अशी व्यवस्था या ठिकाणी केल्यास पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास होऊ शकतो, असा प्रस्ताव वन विभागाच्या माध्यमातून दाखल करून पिंपरखेड गावाला पर्यटनस्थळ म्हणून मंजुरी मिळवून आणली.
तीन वर्षांत दोन टप्प्यांत अडीच कोटी रुपयांचा निधी या स्थळाच्या विकासासाठी उपलब्ध करण्यात आला. संरक्षित लळिंग वनक्षेत्राचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन’ असे नामकरण करून या परिसरात वनसंवर्धनासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विशेष वन लागवड कार्यक्रमात साडेचार हजार हेक्टर लळिंग वनक्षेत्राचा समावेश होण्यासाठी आ. पाटील यांनी पाठपुरावा केला.
वनक्षेत्रात सडगाव येथे सुमारे १५ लाख रुपये खर्च करून धरण बांधण्यात आले.
महसूल व वन विभागाचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी धुळे येथे आले असता त्यांच्या माध्यमातून अक्कलपाडा धरणाजवळ निसर्गपूरक पर्यटन स्थळ आणि अक्कलपाडा धरणातील पाण्यात साहसी क्रीडा प्रकारासाठी संकुल होऊ शकते, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आमदारांनी मांडला होता.
डेडरगाव येथील पर्यटन स्थळ अधिक विकसित करून तेथील वालुका आधारित जलशुद्धीकरण केंद्र पर्यटकांना आकर्षित करणारे ठरू शकते असे मुद्दे आ. पाटील यांनी मांडले होते. पुढील तीन वर्षांत जवळपास ५० कोटी रुपये या सहाही पर्यटन स्थळांच्या विकासावर खर्च होणार असून याद्वारे सुमारे एक हजार लोकांसाठी रोजगार निर्माण होणार आहे.
 पिंपरखेड, लळिंग किल्ला व परिसर, हरणामाळ साठवण तलाव, नकाणे तलाव, डेडरगाव तलाव आणि अक्कलपाडा धरणाचा परिसर हा पर्यटकांना आकर्षित करणारा असल्याचे मत आ. पाटील यांनी व्यक्त केले आहे.