दिवसभरात किती ब्रास वाळू उचलली याची अनाधिकाराने माहिती विचारली. ती दिली नाही म्हणून  फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिल्यावरून राहाता न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी पोलिसांनी शिवराज्य पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर याच्यासह ६ जणांविरुद्ध अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अमोल बबन रोकडे (वय २४, राहणार संक्रापूर, ता. राहुरी) यांनी भोरच्या विरोधात फिर्याद केली आहे.
रोकडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की काही मित्रांसमवेत २० एप्रिल रोजी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड रस्त्याने कोल्हारकडून बाभळेश्वरकडे जेवणाकरिता जात असतांना यातील साक्षीदार सुनिल नाथाजी शिंदे यांनी मोबाईलवर फोन करुन आम्हालापण जेवणासाठी यायचे आहे असे सांगितले. फिर्यादी अमोल रोकडे त्यांना म्हणाला की मी कोल्हार शिवारातील बोराडे पेट्रोल पंपासमोर थांबलो आहे, तिथे तुम्ही या.
त्याच दरम्यान नगरकडून येणारी स्कार्पिओ मोटार (एम एच.१६ एजे ७२१९) ही फिर्यादी जवळ येऊन थांबली व आरोपी भोर याने मोटारीतुन उतरुन फिर्यादी रोकडेला विचारले की ३ एप्रिलला दिवसभरात किती ब्रास वाळू उचलली. याची माहिती विचारली. रोकडे यांनी सांगितले की मी माहिती देऊ शकत नाही. याचा आरोपींना राग आला. त्यांनी फिर्यादी रोकडे यास मारहाण, धक्काबुक्की करीत लोकांसमोर जातीयवाचक शिवीगाळ केली. आता तू आमच्या तावडीतून वाचला, पुन्हा नडला तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिली.
फिर्यादी रोकडे याने यासंदर्भात राहाता येथील वकील भास्कर पठारे यांच्या मार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लोणी पोलीसांनी शिवराज्य पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष संजीव बबन भोर (रा. नगर), गणेश इंद्रभान हारदे, कार्तिक इंद्रभान हारदे, रवि काळे (तिघेही राहणार चिंचोली, ता.राहुरी,), कुणाल दशरथ गायकवाड (रा.कोल्हार) या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.