ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर तसेच आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ होत असून घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, इतर गुन्ह्य़ांच्या तुलनेत घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून चोरी, घरफोडी करणाऱ्यांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना फारसे यश मिळत नाही, अशी माहिती पुढे येत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे या पाच परिमंडळात ३३ पोलीस ठाणी येतात. या पोलीस ठाण्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या गुन्ह्य़ांची नोंद होत असते. त्यामध्ये खून, दरोडा, बलात्कार, हाणामारी, घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि इतर गुन्ह्य़ांचा समावेश असतो. ठाणे पोलीस आयुक्तालयात दरवर्षी घडणाऱ्या गुन्ह्य़ांची नोंद आणि त्यापैकी किती गुन्हे उघडकीस आले, याची सविस्तर माहिती वृत्तान्तकडे असून ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न उपस्थित होतील, अशी ही आकडेवारी आहे. यापूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ाची नोंद चोरीच्या गुन्ह्य़ात करण्यात येत होती. मात्र, जबरी चोरीच्या गुन्ह्य़ामुळे सोनसाखळी चोरांना कठोर शिक्षा होऊ शकते, असा पोलिसांचा दावा आहे. यामुळे गेल्या वर्षांपासून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ाची नोंद जबरी चोरीच्या गुन्ह्य़ात करण्यात येत असल्याने चोरीच्या गुन्ह्य़ांमध्ये घट होणे अपेक्षित होते. मात्र, जबरी चोरीचे गुन्हे वाढले असले तरी, चोरीचे गुन्हे काही कमी झालेले दिसून येत नाहीत.
रहिवाशांसाठी धोक्याची घंटा
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रहाणाऱ्या रहिवाशांसाठी ही एकप्रकारे धोक्याची घंटा असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सोनसाखळी चोरांचा उपद्रवही खूप वाढला आहे. के.पी.रघुवंशी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार असताना त्यांनी सोनसाखळी चोरांना जरब बसावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. मोहिमाही आखण्यात आल्या. त्यानंतर काही काळ सोनसाखळी चोरांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गृहिणींच्या मनात धडकी भरविणारे हे चोर आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरांमध्ये पुन्हा सक्रिय झाले असून या चोरांचा छडा लावण्यात पोलिसांना फारसे यश मिळालेले नाही हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
यंदाच्या वर्षी (नोव्हेंबपर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारी) घरफोडीचे १५२७ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ३९२ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर चोरीचे २८९३ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ६९८ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच यंदा जबरी चोरीचे ११९० गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ४३४ उघडकीस आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
चोऱ्या, घरफोडय़ांचे प्रकार वाढले..
ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर तसेच आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ होत

First published on: 30-12-2014 at 06:38 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news