एका प्रियकराचा कंटाळा आला, म्हणून त्याला सोडून दुसऱ्याशी संबंध जोडणाऱ्या महिलेने या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्याचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे.
दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील महेश्वरी रोड येथे राहणारा वैभव आचरेकर (३१) हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता होता. डोंगरी पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रारही दाखल झाली होती. त्याचा शोध चालू असताना वसई तालुक्यातील वाळीव पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. मृतदेहाची खातरजमा केली असता तो वैभवचाच असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी वैभवच्या मोबाइल नंबरचे सर्व तपशील मागवले असता त्या तपशिलात त्याने एका क्रमांकावर सातत्याने फोन केल्याचे त्यांना आढळले. हा नंबर एका महिलेचा असल्याचे समजल्यावर पोलिसांनी या ३४ वर्षीय महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता या महिलेने गुन्ह्य़ाची कबुली दिली. वैभवची हत्या आपल्या प्रियकराच्या मदतीने केल्याचे तिने सांगितले. वैभव आणि ही महिला यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी दुसरा पुरुष आल्याने तिला वैभवचा त्रास जाणवू लागला. या महिलेच्या प्रियकराने २० ऑगस्ट रोजी आपल्या मित्राच्या मदतीने वैभवला फोन करून वसई तालुक्यातील नायगाव येथे बोलावून घेतले. आपण पोलीस असल्याचे सांगत या दोघांनी त्याला एका खोलीत डांबून मारहाण केली आणि गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तेथील नदीत फेकून देण्यात आला होता, असे या महिलेने चौकशीत सांगितले. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांच्या साथीदाराचा तपास चालू असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त दिवाडकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2014 रोजी प्रकाशित
दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्याची हत्या
एका प्रियकराचा कंटाळा आला, म्हणून त्याला सोडून दुसऱ्याशी संबंध जोडणाऱ्या महिलेने या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्याचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे.

First published on: 24-12-2014 at 06:44 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes in mumbai