आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली असून ऐन एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचणार आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत बॉलिवूडसह मराठीतील काही चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर काही मराठी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर कलाकारांची असणारी उपस्थिती, महाराष्ट्र आणि देशभरात मतदानाच्या असलेल्या वेगवेगळ्या तारखा, निवडणुकीमुळे लोकांचा बदललेला ‘मूड’, प्रसारमाध्यमांकडून निवडणुकीला दिलेल्या प्राधान्यामुळे मनोरंजन/चित्रपटाच्या बातम्यांना कमी प्रमाणात प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आदी कारणांमुळे चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.
मुंबईसह महाराष्ट्रातही तीन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळेएखादा चित्रपट जेथे मतदान होऊन गेले असेल, अशा ठिकाणी जरी प्रदर्शित केला गेला तरी राज्यात अन्य ठिकाणी त्यावेळी मतदान झालेले नसेल. त्यामुळे आधी एका ठिकाणी आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी असे करणे अडचणीचे ठरू शकते. तसेच निवडणूक आचारसंहितेमुळे चित्रपटाची प्रसिद्धी करण्यावर काही मर्यादा येतात. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलणे हा पर्याय समोर असल्याचे एका निर्मात्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
‘पिकल एन्टरटेंटमेंट’ चित्रपट वितरक कंपनीचे समीर दीक्षित यांनी सांगितले की, ‘टपाल’ हा मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र निवडणुकीच्या धामधुमीमुळे आता तो १ मे रोजी प्रदर्शित करत आहोत. तसेच अन्य काही मराठी चित्रपटांचेही प्रदर्शन पुढे ढकलावे, अशी चर्चा निर्माते-वितरक यांच्यात सुरू आहे. येत्या दोन-चार दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल. निर्मात्या समृद्धी पोरे म्हणाल्या की, निवडणुकीच्या धामधुमीमुळे ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित करण्याचे आम्ही ठरविले आहे. तर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली नसल्याचे सांगून ‘सुराज्य’ हा चित्रपट ठरलेल्या तारखेला म्हणजे १८ एप्रिल रोजी आम्ही प्रदर्शित करत असल्याचे चित्रपटाचे निर्माते संतोष मांजरेकर यांनी सांगितले.
मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही २० हून अधिक चित्रपट या दोन महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. मात्र निवडणुकीच्या तारखांमुळे यापैकी काहींचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
एप्रिल आणि मे महिन्यात प्रदर्शित होणारे काही हिंदी चित्रपट
११ एप्रिल- ‘भूतनाथ-२’, ‘कोचिदियान’.
४ एप्रिल- ‘मै तेरा हिरो’, ‘पी से पीएम तक’
१८ एप्रिल- ‘टु स्टेटस’
२५ एप्रिल- ‘कांची’, ‘रिव्हॉल्व की रानी’, ‘क्या दिल्ली क्या लाहोर’.
१ मे- ‘सम्राट अॅण्ड कंपनी’, ‘मस्तराम’, ‘सुपरनानी’, ‘सिटी लाईट’
९ मे- ‘दावत ए इश्क’, ‘हवा हवाई’,
२३ मे- ‘उंगली’ व ‘देसी मॅजिक’