मातंग समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या त्वरीत मान्य कराव्यात असे निवेदन नाशिक जिल्हा मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, उपाध्यक्ष मधुकर बोराडे, कैलास वाकळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मातंग समाजाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतंर्गत जमिनीचे वाटप व्हावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
यांचे साहित्य महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून प्रत्येक जिल्हा स्तरावर शासनाच्या वतीने अण्णाभाऊ
साठे वाचनालय सुरू करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करावे, महाराष्ट्र शासनाच्या वतने देण्यात येणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार महाराष्ट्र दिनी देण्यात यावा, जेणेकरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंच्या योगदानानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देता येईल.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, क्रांतीवीर लहूजी (वस्ताद) साळवे यांच्या नावे व्यायामशाळा सुरू कराव्यात,
मातंग समाजाच्या लोकसंख्येवर आधारित शासकीय नोकरी व विविध क्षेत्रातील अनुशेष भरून काढावा, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.