गोदावरीचे प्रदूषण आणि ते दूर करण्यासाठी विविध संस्था व संघटनांकडून वारंवार प्रयत्न केले जात असले तरी त्यांना मर्यादा येत असल्याचे उघड होत आहे. पुढील वर्षी कुंभमेळा होणार असल्याने गोदावरीचे प्रदूषण हा विषय अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाच्या धर्तीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी गोदावरी विकास व संरक्षण प्राधिकरणची निर्मिती करावी असा ठराव येथील भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या बैठकीत करण्यात आला.
मुंबई येथील मिठी नदी प्रदुषण मुक्तीसाठी राज्य शासनाने १९ ऑगस्ट २००५ रोजी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणची निर्मिती केली. त्या माध्यमातून काम सुरू केले. या प्राधिकरणात शासकीय अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ, लोक प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. अशाच प्रकारे गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करण्यासाठी स्वतंत्र गोदावरी विकास व संरक्षण प्राधिकरणाची निर्मिती करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. महानगर पालिका, जलसंपदा आणि बांधकाम या खात्यांकडून गोदावरीसाठी येणारा निधी आणि केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी यांचा विनियोग या प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी सूचनाही करण्यात आली. केवळ सिंहस्थाच्या निमित्ताने गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या योजनेला प्राधान्य देणे गरजेचे असले तरीही गोदावरी नदी ही कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त कशी होईल या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारी योजना या प्राधिकरणाच्या माध्यमातून टप्याटप्याने राबविण्याची मागणी या सभेमध्ये जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केली.
पाणी बचतीसाठी जलसाक्षरता वाढविणे, गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता लोक सहभाग वाढविणे या विषयांवरही चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये संस्थेचे सचिव दिलीप अहिरे, सदस्य सरोजिनी तारापूरकर, रंजना परदेशी, शैलेश पाटोळे, प्रदीप कुलकर्णी, हेमंत जानवे, छाया गुंजाळ आदिंनी सहभाग घेतला. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील अनेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. परंतु त्यांच्या कार्यात सातत्याचा अभाव असल्याने आणि नागरिकांकडून त्यांना पुरेशा प्रमाणात साथ मिळत नसल्याने त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्यात आडकाठी येत आहे. गंगा घाटावरच मोठय़ा प्रमाणावर धुणे तसेच वाहने धुतली जातात. त्यामुळेही नदीचे पाणी प्रदूषित होत असते. निर्माल्य पाण्यात न टाकता कुंडीमध्ये टाकण्याचे आवाहन वारंवार करण्यात येऊनही भाविक नदीमध्येच निर्माल्य टाकत असल्याने पाण्याला दरुगधी येते. विशेष म्हणजे तेच पाणी दूरवरून आलेले भाविक तीर्थ म्हणून घरी नेत असतात. कुंभमेळ्यात तर गोदावरीत स्नान करणाऱ्यांची संख्या कित्येक लाखाच्या घरात असते. या पाश्र्वभूमीवर गोदावरीचे पावित्र्य जपण्याची गरज सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच भारतीय जलसंस्कृती मंडळाने केलेल्या मागणीस महत्व प्राप्त झाले आहे.