म्हाडाचा फ्लॅट बनावट शपथपत्र दाखल करून हडपल्याचा दोष सिद्ध झाल्याने दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांना म्हाडा निर्मित अमरावती मार्गावरील समृद्धी संकुलातील ए-३/१०१ क्रमांकाची निवासी सदनिका १७ जुलै २००४ रोजी वाटप करण्यात आली होती. दुष्यंत चतुर्वेदी यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने नागपूर महापालिकेच्या हद्दीत मालकी हक्काचे, अथवा भाडेपद्धतीवर घर अथवा भूखंड नाही, असे खोटे शपथपत्र दाखल करून त्यांनी ही सदनिका हडपली. हडपलेल्या या सदनिकेत ते स्वत राहात नसून त्यांनी अनेक वषार्ंपासून आशिष पानट नावाचे भाडेकरू ठेवले आहे.
कोतवालनगर, सिव्हिल लाईन्स येथील करोडपती गल्ली आणि एच.बी. टाऊन येथे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाने घर आहे. हे सिद्ध झाल्याने मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांना सात दिवसांच्या आत सदनिका खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्यंत चतुर्वेदी यांनी बनावट शपथपत्र दाखल करून फ्लॅट हडपल्यानंतर तत्कालिन स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी हा प्रकार म्हाडा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला होता. तसेच या सदनिकेचे वितरण रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांना खुलासा मागितला होता. दोनदा संधी दिल्यानंतरही त्यांनी खुलासा केला नाही. यानंतर सदनिकेची तपासणी करण्यात आली असता खरा प्रकार उघडकीस आला. यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सदनिका खाली करण्याचे आदेश दिले. हा गैरप्रकार सिद्ध झाल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे.