शिक्षकांच्या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर (कॅम्प) येथील जि. प. प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी सोमवारी कुलूप ठोकले. तिसऱ्या दिवशीही शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षण विभागाने याकडे डोळेझाक केल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.
रूपूर (कॅम्प) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची ही शाळा आहे. शाळेत जोडिपपरी, रूपूर कॅप्म आदी जवळपासच्या गावांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची संख्या १७० असून शाळेला ५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. शाळेवरील एका शिक्षकाची काही महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाली. दुसरा शिक्षक दीर्घ रजेवर असल्याचे सांगितले जाते. मुख्याध्यापक कामकाजानिमित्ताने जिल्ह्याच्या ठिकाणी जात असल्याचे सांगितले जाते. दोन शिक्षक कसे-बसे या शाळेकडे पाहतात.
शिक्षकांच्या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर शिक्षण समिती अध्यक्ष शेख हबीब, शिवाजी गिते, सुरेश नाडकर, गणेश गोडघासे, ललिता जैस्वाल, विनिता जोंधळे आदींच्या सह्य़ा आहेत.