शहर परिसरात डेंग्युचे रुग्ण व मृतांची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग सक्रिय झाला असल्याचा दावा करत आहे. मात्र खासगी तसेच सरकारी रुग्णालय यात समन्वय नसल्याने डेंग्युच्या रुग्णांची निश्चित स्पष्टता होत नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात डेंग्युमुळे ८ रुग्ण दगावले असताना आरोग्य विभाग अद्याप हा मृत्यू डेंग्यु मुळे झाला असल्याचे मान्य करत नाही. याबाबत ‘समिती’कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्टता होईल असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, नाशिक महापालिका या त्रिस्तरीय यंत्रणेकरून सध्या डेंग्यु निवारणासाठी युध्दपातळीवर प्रयत्न होत असल्याचा दावा संबंधितांकडून केला जात आहे. यासाठी आठवडय़ाचे स्वच्छता वेळापत्रक, स्वच्छता अभियान, कचऱ्याची विल्हेवाट, कोरडा दिवस असे विविध प्रयत्न डेंगु निवारणासाठी होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या संदर्भात घेतलेल्या बैठकीत ग्रामसेवकांसह शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांना सूचना करण्यात आल्या. बालदिनापासून शिक्षण विभाग आरोग्य विभागाच्या सहकार्याने ‘स्वच्छता सप्ताह’ राबविणार आहे. असे प्रयत्न सुरू असताना मागील तीन महिन्यांच्या कालावधीत डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा जागी झाली असा नागरिकांचा आक्षेप आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या अहवालात चालु वर्षांत ८ रुग्ण डेंग्युने दगावले असल्याचे सांगण्यात आले. मात्र २ संभाव्य आणि ६ रुग्णांच्या मृत्यूची निश्चिती प्रलंबित आहे असा शेरा नमूद करण्यात आला आहे. वास्तविक रुग्ण डेंग्युने दगावले हे वास्तव असुनही प्रशासन अद्याप ते मान्य करण्यास तयार नाही. शहरात डेंग्युने तिसरा बळी घेतला. नीलाक्षी शांताराम सरोज ही सात वर्षीय बालिका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. शनिवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
डेंग्युमुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा माहिती दडपादडपीचा प्रयत्न करत असल्याची साशंकता आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील वाकचौरे यांच्याकडे विचारणा केली असता रुग्ण डेंग्युने दगावले असले तरी त्या संदर्भातील अहवाल जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. डेंग्युसदृश रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन, त्यांच्या मृत्यूपुर्व झालेल्या विविध आरोग्य तपासण्या, औषधे यासह अन्य वैद्यकीय बाबींची शाहनिशा करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह आठ ते दहा लोकांची समिती आहे.
समितीकडून अहवाल प्राप्त झाल्याशिवाय रुग्णाचे निदान करता येत नाही. यामुळे अहवालात संभ्रम आहे. या संदर्भातील त्यांच्या बैठक ठराविक कालावधीने होत असल्याने त्याचा पाठपुरावा वारंवार करता येत नाही. मृतांच्या आकडेवारी पेक्षा प्रबोधनाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.