स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विवेकानंद जयंती साजरी करण्याचे सरकारचे आदेश असताना स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती चाकूरच्या पदाधिकाऱ्यांनी येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे मैदान कार्यक्रमास देण्याची मागणी प्राचार्याकडे केली. परंतु प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी ती धुडकावून लावताना तीच जागा तमाशाला दिली! या प्रकाराविषयी जनतेत संताप व्यक्त होत आहे.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या वतीने या महाविद्यालयात शहरातील तरुणांना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक व स्वामी विवेकानंदांचे आचार-विचार या बाबत माहिती देण्यात आली. बीड येथील प्रसिद्ध डॉ. सुभाष जोशी यांच्यासह मराठवाडय़ातील अन्य डॉक्टरांचे पथक तरुणांना मार्गदर्शन करण्यास येणार होते. महाविद्यालयातील तरुणांना मार्गदर्शन व्हावे, म्हणून स्वामी विवेकानंद सार्ध शती समितीच्या वतीने भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे मैदान प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ही मागणी धुडकावून लावत संस्थेकडे बोट दाखवले. मात्र, तीच जागा लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर यांच्या कार्यक्रमाला दिली.
लावणी कार्यक्रमामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात मोठा व्यत्यय आला. या महाविद्यालयात मुलींसाठी सावित्रीबाई वसतिगृह आहे. त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चाकूर येथे हे महाविद्यालय लोकमान्य या नावाने सुरू झाले. परिसरात लोकमान्य टिळकांच्या नावाने असलेल्या महाविद्यालयाला वटवृक्षाचे रूप आले.
मात्र, संस्थेचे अध्यक्ष तथा पुरोगामी विचाराचे प्रणेते माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांनी संस्थेत ठराव घेऊन लोकमान्यांचे नाव पुसले आणि स्वत:च्या नावाने नामकरण केले. अशा या संस्थेच्या प्राचार्यानी खुले मैदान विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी न वापरता लावणीसाठी वापरले, त्याबद्दल चाकूरकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.