आतापर्यंतची सर्व मोठी नाटके ही उच्चभ्रू, मध्यमवर्गीय समाजासाठी सादर करण्यात आली आहेत. मात्र आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग असलेला दुर्बल घटक या व्यवस्थेपासून दूर असतो. त्याला नाटक म्हणजे काय येथपासून ते त्यांच्या दैनंदिन भेडसावणाऱ्या विषयांना कुठे वाचा फोडायची याची काही माहिती नसते. यासाठी झोपडपट्टीतील मुलांना आपले स्थानिक विषय घेऊन रंगमंचावर येण्याची संधी मिळावी म्हणून, झोपडपट्टीतील मुलांना त्यांचे स्थानिक पातळीवर भेडसावणारे विषय घेऊन छोटी नाटके बसवण्यास सांगितले आहे. वीस गटात या नाटिका करण्यात येणार आहेत. या माध्यमातून या मुलांना व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना जगण्याच्या समस्येवर झोत टाकण्याची संधी मिळेल, अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक व चतुरंगच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी रत्नाकर मतकरी यांनी येथे चतुरंग रंगसंमेलनात दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर, लेखक मंगेश मतकरी यांनी रत्नाकर मतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांना ‘बालपण ते लेखका’पर्यंतचा प्रवास विषयावर बोलते केले.
शाळा, महाविद्यालयांमध्ये एकांकिका स्पर्धा घेऊन त्यात विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धाच्या निमित्ताने शाळाशाळांमध्ये पारितोषिके मिळवण्यासाठी चढाओढ लागते आणि त्यामुळे मूळ विषय बाजुला राहतो. या स्पर्धामध्ये मुलांना व्यासपीठ मिळते; पण त्यांचे कलागुण आणि व्यक्त व्हायला वाव नसतो. त्यामुळे नाटिकांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे मतकरी यांनी स्पष्ट केले. मुलांना व्यक्त होण्यासाठी रंगभूमी हे मोठे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाकडे आकर्षित करण्यासाठी मौजमजा, विनोदी, गूढ अशा आशयाने भरलेले भव्य नाटक करावे लागेल. ‘बोलक्या बाहुल्या’ कार्यक्रमाचे रामदास पाध्ये यांनी यासाठी सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. या उपक्रमासाठी पैसा कोठून उभा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. या उपक्रमाला कोणी उद्योजकाने मदत केली तर तात्काळ नाटय़ाविष्काराचा हा प्रकल्प सुरू करता येईल, असे मतकरी म्हणाले.
नाटकातील ‘परी’कथेच्या माध्यमातून मुलांना रंगभूमीकडे वळवण्याचा आपला प्रयत्न सुरू असतो. हे समजून घेण्यापेक्षा आपल्याकडचे बुद्धिवंत लगेच मुलांची नाटके वास्तववादी, विज्ञानवादी कधी होणार म्हणून टीकेला सुरुवात करतात. ‘हॅरी पॉटर’वर टीका करणारी ही मंडळी त्याची पुस्तके लाखोने संपली की त्याचे कौतुक करतात. अशी दुटप्पी भूमिका घेणारे बुद्धिवंत रंगभूमीच्या वाटचालीत मोठा अडथळा आहेत, अशी खंत मतकरी यांनी व्यक्त केली.
‘मुलांना तू अमुकच हो, अमुकच कर’ यापेक्षा त्यांना दिलेले निवड आणि निर्णयाचे स्वातंत्र्य हा घरातील मोठा संस्कार आहे. मुलांना हे स्वातंत्र्य मोठे करते. आपले वडील पंडित होते. घरात पुस्तके होती. त्यांचे वाचन केले. घरातील संस्कार, शाळेत शिक्षकांचे मार्गदर्शन या घडणीतून नकळत लेखन स्फूर्तीने होत गेले आणि रंगभूमीवर ते व्यक्त झाले. दिग्दर्शकाने सेटशी तडजोडी न करता नाटकाचे सादरीकरण केले तर नाटकाचा मूळ गाभा कायम राहून प्रेक्षक त्याचे स्वागत करतो. इतरांपेक्षा नाटकाचे प्रेक्षकांनी केलेले विश्लेषण खूप महत्त्वाचे असते, असे रत्नाकर मतकरी म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2015 रोजी प्रकाशित
वंचित घटकांमधील मुलांनाही नाटक करण्याची संधी मिळणार
आतापर्यंतची सर्व मोठी नाटके ही उच्चभ्रू, मध्यमवर्गीय समाजासाठी सादर करण्यात आली आहेत. मात्र आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग असलेला दुर्बल घटक या व्यवस्थेपासून दूर असतो.
First published on: 03-01-2015 at 12:32 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deprived children get the opportunity of participating in drama