उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २१) हिंगोलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
जिल्ह्य़ातील हिंगोली-नांदेड या मुख्य मार्गाची अवस्था खूपच दयनीय झाली असून तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीकडेच असताना राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले, हा चर्चेचा विषय झाला आहे. या पाश्र्वभूमीवर येथील कल्याण मंडपम व राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. विश्रामगृहातून सरळ राष्ट्रवादी भवनावर जाण्याचा हा एकमेव मार्ग असून, अग्रसेन चौक ते विश्रामगृह दरम्यान सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या २ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्यांचे काम सुरू होऊन वर्ष संपले, तरी पूर्ण न झाल्याने प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला!
पवार याच रस्त्याने राष्ट्रवादी भवनात जाणार असल्याने त्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा त्रास होऊ नये म्हणून बांधकाम विभाग अचानक जागा झाला आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. वास्तविक, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाखो रुपये खर्चून नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या शोधून सापडणार नाहीत. याचे कारण म्हणजे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात झालेले अतिक्रमण. या पूर्वी लाखो रुपये खर्चून अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, अतिक्रमण काढण्यावर आतापर्यंत कोणी व किती खर्च केला याचा हिशेब कोण विचारणार, तसेच या पूर्वी केलेला खर्च पाण्यात गेला. याची दखल कोण घेणार, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.