उरण तालुका प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयास प्रकल्पग्रस्तांना मानाचे स्थान प्राप्त करून देणारे व वयाच्या उतारवयातही प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या बठकीत घेण्यात आला आहे.
या ठरावाला दि.बां.नी स्वत: संमती दिली असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे उरणमध्ये उभारण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला माजी खासदार दि. बा. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरींग असे नाव देण्यात येणार आहे. सातत्याने संघर्षमय जीवन जगणारे दि. बा. पाटील यांनी समाजाला भरभरून दिले आहे. त्यांनी उभारलेल्या आंदोलनातून रायगड किंवा राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क व अधिकार प्राप्त करून दिला आहे. उरण-पनवेलमध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी दि.बां.नी रयत शिक्षण संस्थेच्या शाखांचे जाळे निर्माण केले. निम्म्या रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी पनवेल येथे महाविद्यालय सुरू केले. त्यांचे नाव या महाविद्यालयास देण्याची इच्छा असतानाही त्यांनी ते नाकारले होते. त्याऐवजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुलेंचे नाव त्यांनी दिले. अशाच प्रकारचे अनेक ठराव उरण व पनवेलमध्ये घेण्यात आलेले आहेत. मात्र त्यांनी नाव देण्याबद्दल संमती दिली नव्हती.
उरणमध्ये मात्र प्रकल्पग्रस्त तसेच सर्वसामान्य स्थानिकांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नाव देण्याचा प्रस्ताव असून दि.बां.नी या प्रस्तावास होकार दिला असल्याचे उरण तालुका प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेने कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
अभियांत्रिकी महाविद्यालयास दिबांचे नाव देणार
उरण तालुका प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पहिल्या अभियांत्रिकी
First published on: 31-01-2014 at 07:00 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Di ba patils name will be given to engineering college