मराठी टेलिविश्वात पहिल्यांदाच प्रेक्षकांना एक कोटी रुपये जिंक ण्याची संधी देणारा ‘कोण होईल मराठी करोडपती’ (केएचएमसी) पुन्हा एकदा नव्या पर्वासह दाखल होणार आहे. हे पर्व ‘जोडी स्पेशल’ असून यात एकाच कुटुंबातील दोघांना हॉट सीटवर बसून एक कोटी जिंकण्यासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे. ‘केएचएमसी’चा मूळ भारतीय अवतार असलेल्या ‘केबीसी’मध्येही अशी संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे ‘केएचएमसी’चे हे पर्व जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करेल, असा विश्वास वाहिनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पहिल्याच पर्वात या शोमुळे ई टीव्ही मराठी वाहिनीशी ६० टक्के प्रेक्षक नव्याने जोडले गेले. त्यामुळे अभिनेते सचिन खेडेकर यांच्या सूत्रसंचलनाखाली रंगणाऱ्या या गेम शोकडून जानेवारीत सुरू होणाऱ्या दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांच्या आणि वाहिनीच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘क ौन बनेगा करोडपती’ या शोचा मराठी अवतार असलेल्या ‘कोण होणार मराठी करोडपती’ या शोने पहिल्याच पर्वात प्रेक्षकांची पकड घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजीवाल्यापासून ते शिक्षिका, डॉक्टर, गायक अशा समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी या शोमध्ये एक कोटी जिंकण्याची संधी आजमावून पाहिली. नव्या पर्वातही सचिन खेडेकर पुन्हा एकदा हॉट सीटची सूत्रे हातात घेणार आहेत. ‘केएचएमसी’च्या दुसऱ्या पर्वात एक कोटी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांना मदत मिळावी, यासाठी ‘जोडी स्पेशल’ सारख्या नव्या गोष्टी आणण्यात आल्या आहेत, असे ईटीव्ही मराठीचे व्यवसाय प्रमुख अनुज पोद्दार यांनी सांगितले.