पुड्डुचेरीच्या माजी नायब राज्यपाल, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या मार्गदर्शिका डॉ. रजनी राय यांचे आज सकाळी न्यू रामदासपेठेतील निवासस्थानी निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. मोक्षधाम घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि तीन कन्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. बुधवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी उपचार केले. आज सकाळी त्यांचे निधन झाले. बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभा घेण्यात आली. यावेळी महापौर अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मंत्री, श्रीकांत देशपांडे, रवींद्र जोशी, राजेश बागडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उच्चविद्याविभूषित आणि प्रख्यात राय घराण्याची स्नुषा असलेल्या डॉ. रजनी राय नागपूरच्या प्रख्यात एलएडी आणि श्रीमती आर.पी. महिला महाविद्यालयातून प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांनी शैक्षणिक, राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला होता. महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या शैक्षणिक उत्थानासाठी प्रचंड परिश्रम घेतले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निकटस्थ वर्तुळातील कार्यकर्त्यां म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची १९९८ साली पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी २००२ पर्यंत कार्यभार सांभाळला. जनसंघ आणि नंतर भाजपचे काम करताना त्यांनी महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयास केले. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून १९९२ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. अनेक पुस्तकांचे त्यांनी भाषांतर केले होते. सहकार क्षेत्रात सहजपणे वावरताना रजनी राय यांनी नागपूर महिला नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांच्याकडे १० वर्षे बँकेचे अध्यक्षपद होते.