घडय़ाळ्याच्या काटय़ाकडे पाहून त्यांनी कधी काम केले नाही..रविवार असो की सुट्टीचा दिवस असो, गंभीर आजारी रुग्णासाठी त्यांनी नेहमीच तात्काळ धाव घेतली. देशभरात मेंदूची अँजिओप्लास्टी करणाऱ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ा ‘इंटराव्हेन्शनल न्युरोरेडिओलॉजिस्ट’ तज्ज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. केईएम रुग्णालयाचे भूषण समजले जाणारे आणि हजारो गोरगरीब रुग्णांसाठी धन्वंतरी असलेल्या डॉ. उदय लिमये यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने केईएमसह शीव व नायर रुग्णालयातील डॉक्टर व प्राध्यापक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
महापालिकेच्या नियमानुसार पालिकेतील सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांना खासगी प्रॅक्टिस करता येते. मात्र सकाळी ९ ते ५ या वेळात त्यांनी महापालिका रुग्णालयात असणे बंधनकारक आहे. दुर्दैवाने अनेक डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा दुरुपयोग केला हे वास्तव आहे. मात्र डॉ. उदय लिमये यांच्यावरही कामाच्या वेळेत उपस्थित नसल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. लिमये यांना प्रशासनाने गेल्या वर्षभरात याच कारणावरून अनेक मेमो दिले आहेत. या प्रत्येक मेमोला उत्तर देताना डॉ. लिमये यांनी आपले म्हणणे मांडले. ९ ते ४ या वेळेत उपस्थित राहणे शक्य नाही हेही प्रशासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे म्हणणे मान्य न करता प्रशासनाने त्यांना अखेर निलंबित करून स्वत:च्या व हजारो रुग्णांच्या पायावर कुऱ्हाड तेव्हढी मारून घेतली आहे.
नव्वदच्या दशकात इंटराव्हेन्शनल न्युरोरेडिओलॉजी हा नवीन विषय होता. त्यावेळी केईएममध्ये डॉ. लिमये यांनी या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करताना केईएमचे नाव जगभर पोहोचविले. आजपर्यंत या विभागात सुमारे दहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया डॉ. लिमये यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्या आहेत. सध्या सहयोगी प्राध्यापक असलेले डॉ. लिमये हे दुर्बिणीद्वारे मेंदूमधील गुंतागुतींच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ख्यातनाम आहेत. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात सात लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. त्या केईएममध्ये डॉ. लिमये गोरगरिबांवर लीलया करतात. गेल्या १५ वर्षांत एकाही अधिष्ठात्यांनी ते अथवा त्यांच्या पथकातील डॉक्टरांच्या कामाच्या वेळेचा प्रश्न उपस्थित केला नव्हता.
विद्यमान अधिष्ठात्रींनी मात्र गेल्या वर्षभरात ९ ते ४ या वेळेत उपस्थित राहात नाहीत म्हणून डॉ. लिमये यांना अनेक मेमो दिले. ‘नियमानुसार माझ्यावरील कारवाई योग्यच आहे. मला अनेक मेमो दिले हेही खरे आहे. मला निलंबित करून आजपर्यंतच्या माझ्या सेवेचे जे चिज प्रशासनाने केले त्यासाठी मी त्यांचा ‘आभारी’ आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आमच्या विभागातील बायप्लेन हे फिलिप्सचे यंत्र कालबाह्य़ झाले असून त्याचा एक भाग बंदच आहे. ते नवीन घेणे आवश्यक असताना त्यावर काहीही निर्णय होत नाही. ज्या परिस्थितीत आम्ही या मशिनच्या सहाय्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करतो ते एकदा पालिकेतील उच्चपदस्थांनी येऊन पाहायला हवे. दुपारी १२ पर्यंत भूलतज्ज्ञ उपलब्ध नसतो. तर शस्त्रक्रियागृह दुपारी ३ नंतर उपलब्ध होते. अशावेशी सकाळी नऊ वाजता येऊन चार वाजता गेले तर रुग्णांवर शस्त्रक्रिया कधी करायच्या, असा डॉ. लिमये यांचा सवाल आहे. ही माहिती अधिष्ठात्या व इतरांना आहे. मी व माझे सहकारी बहुतेकवेळा रात्री उशीरापर्यंत शस्त्रक्रिया करत असतो. सुट्टीच्या दिवशीही गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करतो. मी केवळ खासगी प्रॅक्टिस करत असतो तर आजवर दहा हजार शस्त्रक्रिया कशा केल्या? असे सवालही डॉ. लिमये करतात.
वस्तुस्थिती जाणून न घेता मला निलंबित करण्यात आले. यापुढे मी केईएममध्ये पायही ठेवणार नाही. परंतु मी जर केईएम सोडले तर विभागात काम करायला एकही फेलो पात्र ठरणार नाही. एवढेच नव्हे तर शस्त्रक्रियाही भविष्यात बंद पडतील याची कल्पना अतिरिक्त आयुक्तांना नसावी. याबाबत आपण पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहिणार आहोत. ‘नियम माणसांसाठी आहेत की माणूस नियमांसाठी’ हा खरा प्रश्न आहे. गेल्या १५ वर्षांत केईएममध्ये डॉ. लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली तीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स तयार झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटराव्हेन्शनल न्युरोरेडिओलॉजीच्या क्षेत्रात केईएमचे नाव आदराने घेतले जाते ते डॉ. लिमये यांच्यामुळे. दुर्देवाने केवळ नियमावर बोट ठेवून कारवाई केल्यामुळे जागतिक कीर्तीचा डॉक्टर गमावल्याची खंत केईएममधील अनेक डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2014 रोजी प्रकाशित
डॉ. लिमये पुन्हा मिळणार नाहीत..
घडय़ाळ्याच्या काटय़ाकडे पाहून त्यांनी कधी काम केले नाही..रविवार असो की सुट्टीचा दिवस असो, गंभीर आजारी रुग्णासाठी त्यांनी नेहमीच तात्काळ धाव घेतली.

First published on: 02-07-2014 at 09:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr uday limaye