नाटय़ व सांस्कृतिक परंपरेचा वारसा असणाऱ्या कराड नगरीत नाटय़ चळवळ वृध्दिंगत व्हावी यासाठी कराड अर्बन बँक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले आहे. या एकांकिका स्पर्धाना राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, सिने व सांस्कृतिक क्षेत्रात नवनवीन कलाकार आपल्या कलेचा वारसा निर्माण करत असल्याचे प्रतिपादन अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी केले.
कराड अर्बन सेवक संघातर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सुभाषराव जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, कराड अर्बन बँक सेवक संघाचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक वि. पु. गोखले, सेवक संघाचे पदाधिकारी, सेवक वर्ग तसेच अर्बन परिवारातील सदस्य मोठय़ा संख्यने उपस्थित होते. या कार्यक्रमात सेवकांच्या पाल्यांना त्यांनी प्राप्त केलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल व सेवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पध्रेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सुभाषराव एरम म्हणाले की, कराड हे सांस्कृतिक शहर असून, राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेतून कलागुणांचा विकास करण्याचे काम बँक करीत आहे.  कराड अर्बन बँक ही केवळ बँकिंग व्यवसाय न करता सेवकांच्या कलागुणांचा विकास व त्यांच्या मुलांना प्रोत्साहन देत आहे.
दिलीप गुरव म्हणाले की, बँक सन २०१७ साली शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे. त्या अनुषंगाने बँक विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.
प्रास्ताविक दिलीप चिंचकर यांनी केले.