भीषण पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीमुळे चैत्र-वैशाखात होणाऱ्या गावोगावच्या जत्रा काटकसरीने होत असल्याने करमणुकीचे परंपरागत साधन असणारा पारावरचा तमाशा यंदा रद्द झाला आहे. यात्रेसाठी केवळ ४० टक्केच सुपारी मिळण्याची चिन्हे असल्याने दुष्काळाचे चटके आगामी वर्षभर तमाशा कलावंतांना भाजणार आहेत. सांगली जिल्ह्य़ातील विटा येथे अवघे २० ते २२ फडच यंदा राहुटय़ांमधून ‘सुपारी’ साठी डेरेदाखल झाले आहेत.
सांगली, सातारा, सोलापूरसह कर्नाटकातील अथणी, रायबाग, विजापूर या मराठी भाषिक पट्टय़ातील गावागावात चैत्र पाडव्यापासून जत्रा सुरू होतात.
यंदाही जत्रा सुरू आहेत. मात्र, यंदा दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाला फाटा देऊन केवळ विधी करण्यावरच अनेक गावांनी भर दिला आहे.
पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील यात्रा कमिटीच्या सोयीसाठी सातारा, सांगली व सोलापूर या तीन जिल्ह्य़ाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगली जिल्ह्य़ातील विटा येथे सर्वच लोकनाटय़ मंडळांचे एकत्रित केंद्र दरवर्षी सुरू असते. गावोगावचे लोक इथे येऊन त्यांच्या गावच्या जत्रेसाठी तमाशाचा कार्यक्रम ठरवतात. या केंद्राला ११० वर्षांची परंपरा असून पन्नासहून अधिक लोकनाटय़ तमाशा मंडळांची कार्यालये यासाठी इथे येतात.
यंदाही २२ फडकरी इथे दाखल झाले आहेत. यामध्ये ज्योती-स्वाती पुरुं दावडेकर, बुवासाहेब पिंपरीकर, कृष्णा-पुष्पा बरडकर, पूनमताई बरडकर, सनातन-मनीषा बरडकर, शारदा वाघमारे नागजकर, तानाजी भोसले वाघेरीकर, दत्तोबा तिसंगीकर, प्यारनबाई कराडकर, साधूआत्मा कासेगावकर, चंद्रकांत गुडेकर, बापूराव पिंपरीकर, बेबीताई हिवरे कुरुंदवाडकर, अनिता-सीता कोल्हापूरकर, बच्चूराम घाटनांद्रेकर, संजय हिवरे कुरुंदवाडकर, सीमा अकलूजकर, छाया आगर नागजकर आदी लोकनाटय़ मंडळे विटय़ाच्या या राहुटीत विसावली आहेत. पण त्यांच्याकडे अद्याप फारशा कार्यक्रमांची नोंद झालेली नाही. यंदाचा दुष्काळ, पाणीटंचाईचा गावा-गावांत जमा होणाऱ्या लोकवर्गणीवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक गावांत यंदाचे उत्सव, यात्रा साध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. या साऱ्याचा परिणाम यंदाच्या तमाशा कार्यक्रम नोंदणीवर झाला आहे. यंदा या सुपारीचे प्रमाण चाळीस टक्के देखील नसल्याचे या व्यवसायिकांचे म्हणणे आहे. यासाऱ्यामुळे हा व्यवसाय मात्र यंदा धोक्यात आल्याचे कलाकार बोलत आहेत. हे कलावंत केवळ या चैत्र-वैशाखातील यात्रांमध्ये मिळणाऱ्या मानधनावर वर्ष-वर्ष आपला संसार चालवत असतात. पण यंदा त्यावरच गदा आल्याने आगामी वर्ष कसे काढायचे हा त्यांना प्रश्न पडला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
तमाशा कलावंतानाही यंदा दुष्काळाचे चटके
भीषण पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीमुळे चैत्र-वैशाखात होणाऱ्या गावोगावच्या जत्रा काटकसरीने होत असल्याने करमणुकीचे परंपरागत साधन असणारा पारावरचा तमाशा यंदा रद्द झाला आहे.
First published on: 28-04-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought affected on tamasha actors