नववर्षांत विजयाची गुढी उभारताना मराठवाडय़ातील बहुसंख्य गावांमध्ये टँकरची वाट बघणे चालूच होते. आजघडीला १ हजार ६२५ हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जसजसे ऊन वाढत जाईल, तसतशी पाण्याची मागणी वाढेल आणि ती पूर्ण करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
आष्टी तालुक्यात टँकरने १०० किलोमीटर दुरून पाणी आणावे लागते. उस्मानाबाद शहराची तऱ्हाच निराळी झाली आहे. दररोज कोणीतरी हाळी देते, पाणी आले रे आणि रोज पाठीमागे जलवाहिनी फुटते! शहरात पाणी आल्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सरसावले आहेत. पण पाणी काही आले नाही. जालन्याच्या पाणीपुरवठय़ालाही मोठी गळती आहे. ११ ठिकाणी जलवाहिनी फोडल्याने जालना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हे दाखल आहेत. दिवस कोणताही असो, सण कितीही मोठा असो, पाण्यासाठी वणवण हे चित्र आजही कायम राहिले. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांनी या वर्षी गुढी उभारली, जगन्नियंत्याला वंदन केले आणि एकच प्रार्थना केली, किमान या वर्षांत तरी भरपूर पाऊस होऊ दे! सकाळी शेतकऱ्यांनी कशीबशी गुढी उभारली आणि छावण्यांमध्ये सोडलेल्या जनावरांकडे धाव घेतली. पाण्याशिवाय माणसांचे आणि जनावरांचे भयंकर हाल सुरूच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून छावण्यांसाठीचे अनुदान दिले गेले नव्हते. त्यासाठी अलीकडेच साडेअठरा कोटी रुपये वितरित करण्यात आले. या वर्षी चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने छावणी चालकांना चारा कोठून आणायचा, असा प्रश्न आहेच. त्यांना मिळत असणारे अनुदानही तसे कमीच आहे. मोठय़ा जनावरांसाठी ६० रुपये अनुदान दिले जाते. केंद्र सरकारकडून अनुदानात वाढ झाली आहे.राज्य सरकारमार्फत एका जनावराच्या चाऱ्यासाठी पूर्वी २८ रुपये खर्ची पडत. केंद्राकडून मोठय़ा जनावरांसाठी ३२ रुपये व लहान जनावरांसाठी १६ रुपये अनुदान दिले जात असे. त्यात आता वाढ झाली. एका जनावराच्या चाऱ्यासाठी ५० रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे राज्य सरकारला केवळ १० रुपये खर्च करावे लागतात. ही रक्कम वाढवून देण्याची गरज आहे. कारण चाऱ्याच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे.
पिण्याच्या पाण्याची चोरी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. जायकवाडीतून जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ८८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली. या योजनेच्या वीज देयकावरून मोठे आंदोलन झाले. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी केलेल्या या आंदोलनामुळे जालन्याची पाणीपुरवठय़ाची योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न झाले. मात्र, गेल्या आठवडय़ात पाणीपुरवठय़ाची चाचणी सुरू असतानाच ११ ठिकाणी जलवाहिनी फोडण्यात आली. ही योजना पूर्ण झाली, तर जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मध्येच पाणी पळविले जात असल्याने पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रत्येक गावात पाण्यामुळे वाद सुरू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत पाणी व चाऱ्याची व्यवस्था छावण्यांमध्ये योग्य प्रकारे होत असल्याने दुधाच्या उत्पादनात फारशी घट झाली नाही. तथापि, येत्या दोन महिन्यांत दूधही घटेल, असे सांगितले जाते. दुष्काळाचे परिणामही आता जाणवू लागले आहेत. आज दिवसभरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. या वर्षी त्याला फटका बसला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही बाजारात तशी मंदी होती. उन्हाची तीव्रता एवढी होती की, दुपारी रस्त्यावर अक्षरश: शुकशुकाट होता. बाजारपेठेत गर्दी तशी नव्हतीच.

पाडव्याचा जल्लोष, उत्साहाची पर्वणी..
गुढीपाडवा अर्थात नववर्षांचे मराठवाडय़ात सर्वत्र पारंपरिक उत्साहाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे औरंगाबाद शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या गुलमंडी येथील हे दृश्य. शोभायात्रेत विविध धार्मिक संघटना सहभागी झाल्या होत्या. देखाव्यांसह पारंपरिक वेशभूषा केलेले संघटनांचे प्रतिनिधी, तसेच विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग यात्रेचे आकर्षण ठरले.