राज्याचा अर्ध्याहून अधिक भाग दुष्काळाने होरपळत असताना आपण डामडौल करणे योग्य नसल्याने श्री गणेश मंदिर संस्थानने या वेळी ११ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी होणारी नववर्ष स्वागत यात्रा अतिशय साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वागत यात्रेतील अनेक कार्यक्रमांना कात्री लावून बचत होणारा पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. स्वागत यात्रेसाठी दरवर्षी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च येतो. या रकमेतील अधिकाधिक रक्कम बचत करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला. स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला मंदिराचे अध्यक्ष जयकृष्ण सप्तर्षी, अच्युत कऱ्हाडकर, सचिन कटके, वैद्य विनय वेलणकर, राहुल दामले, प्रवीण दुधे, शामकांत भाटय़े उपस्थित होते. स्वागत यात्रेच्या दिवशीचा कार्यक्रम लांबल्याने अनेकांना रणरणत्या उन्हाचा त्रास होतो त्यामुळे स्वागत यात्रेचा जाहीर कार्यक्रम संभाजी महाराज बलिदानाच्या दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी कान्होजी जेधे मैदान येथे रात्रौ आठ वाजता होणार आहे. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, अर्थतज्ज्ञ गिरीश जखोटिया, महंत ललितदास गुरुमहाराज, निवृत्त ब्रिगेडिअर अजित श्रीवास्तव उपस्थित राहणार आहेत.
स्वागत यात्रेत ७५ चित्ररथ असणार आहेत. या सर्व संस्थांचा ११ एप्रिल रोजी गणेश मंदिर संस्थानतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेत उज्ज्वल निकम, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सहभागी होणार आहेत. फटाक्यांची आतषबाजी, इतर खर्चिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दुष्काळ निधीसाठी आवाहन
गणेश मंदिर संस्थानतर्फे सुमारे १५ ते २० लाखांचा निधी जमविण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. यात्रेतील संस्था, नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी या निधी जमविण्याच्या कार्यक्रमाला हातभार लावावा. हा सर्व निधी कोणाच्याही स्वाधीन न करता मंदिर संस्थानतर्फे प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागातील गावांसाठी खर्च करण्यात येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी या भागात कायमस्वरूपी काही सुविधा देण्याचा प्रयत्न संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. १० लाख सामाजिक संस्था, ३५ शाळांमधील विद्यार्थी आणि गणेश मंदिराचा पाच लाखांचा निधी एकत्रित करून दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे, असे राहुल दामले यांनी सांगितले. दुष्काळ निधी देण्यासाठी गणेश मंदिरात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वागत यात्रेतील कार्यक्रम
६ एप्रिल, मराठी संगीत मैफल, संध्याकाळी सात वाजता, स्थळ- अप्पा दातार चौकात, सहभाग-अजित परब, मधुरा कुंभार, नेहा वर्मा, जयदीप भगवाडकर, ७ एप्रिल, सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, तरुणांसाठी कार्यक्रम, स्थळ- गणेश मंदिर, संध्याकाळी ७ वा. श्रीनिवास खळे यांचा ‘तो राजहंस एक’ गाण्यांचा कार्यक्रम, स्थळ- अप्पा दातार चौक, ८ एप्रिल, ज्येष्ठ नागरिक स्पर्धा, संध्या. ५ वा. स्थळ -गणेश मंदिर, ९ एप्रिल, पहाटे साडेपाच वाजता सूक्त पठण, दीपोत्सव, स्थळ- गणेश मंदिर, १० एप्रिल, संभाजी महाराज बलिदान दिन, प्रदूषणमुक्त दीपोत्सव, जाहीर कार्यक्रम, संध्या. ६ वा. स्थळ- कान्होजी जेधे मैदान. ११ एप्रिल, स्वागत यात्रा सकाळी आठ वाजता.