सुरगाणा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन विभागीय वनअधिकारी डिंगबर पगार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यादव उपस्थित होते. सुरगाणा आणि परिसरातील वनक्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत असून त्याचे तातडीने संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक महाविद्यालयीन युवकांनी पुढे यावे असे आवाहन पगार यांनी केले. वनांचा किती मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे याची आकडेवारीही त्यांनी सादर केली. हे असेच सुरू राहिल्यास पुढील पाच सहा वर्षांतच सुरगाणा तालुक्यात पिण्याचे पाणी व शेतीबाबत भयावह स्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुखांनी केले.
‘सेंट फ्रान्सिस’ मधील विद्यार्थ्यांना अर्थसाह्य
रोटरी क्लब ऑफ नाशिक  मिडटाऊनच्या वतीने सेंट फ्रान्सिस हायस्कुलमधील दोन निराधार विद्यार्थ्यांना १८, ५०० रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश नुकताच देण्यात आला. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी देसाई, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रभाकर दवंडे, सहसचिव सुहास पाटील, के. आर. देसाई, डी. आर. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दवंडे यांनी सेंट फ्रान्सिसच्या दोन निराधार विद्यार्थ्यांना क्लबच्या वतीने दरवर्षी मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. संकेत गायकवाड व सचिन पंडित यांना धनादेश देण्यात आला. सुहास पाटील यांच्या हस्ते काही सभासदांचा सत्कार करण्यात आला. राहुल चोपडा यांनी आभार मानले.
मॉडर्न हायस्कुलची अनोखी राखी
नाशिक येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित जुने सिडकोमधील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी ‘वन्यजीव वाचवा वसुंधरा वाचवा’ संदेश देणारी भव्य राखी हरित्ोसेना मार्गदर्शक अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली. राखी तयार करण्यासाठी हेमंत तोरवणे, प्रगती देवरे, केतन घोडके, नमन शेख, माहिम शेख, श्रध्दा बागूल, सागर कोथळकर, पूजा कोभळकर, सपना परदेशी, जयेश गुप्ता, शबाना शेख, निरज काळे, हर्षदा दांगट या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. त्यांना मुख्याध्यापिका एस. एस. गायधनी, पर्यवेक्षक ए. आर. माळी यांनी मार्गदर्शन केले.