येथील संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृध्द महिलेला परिचारकाने बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रुग्णालयात धाव घेऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले. मारहाण करणाऱ्या अपंग परिचारकाला निलंबित करण्यात आले. या रुग्णालयात कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याकडे आहे. मनसेच्या कोणा पदाधिकाऱ्याला हा ठेका हवा असल्याने संबंधितांनी वातावरण तापविल्याची चर्चा आहे.
विभागातील पाच जिल्ह्यांतील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने आकारास आलेले संदर्भ सेवा रुग्णालय वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. वादविवादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुग्णालयात पुन्हा असाच प्रकार घडला. या ठिकाणी मालेगाव येथील जिजाबाई सोमवंशी या ६२ वर्षीय वृद्धा उपचार घेत होत्या. रविवारी रात्री अनावधानाने त्यांच्या पायाचा धक्का परिचारक संदीप पवारला लागला. यामुळे संदीप संतापला आणि त्याने थेट उपचार घेणाऱ्या जिजाबाई यांना मारहाण सुरू केली. यावेळी लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. मारहाणीमुळे जखमी झालेल्या जिजाबाई यांची प्रकृती आणखी बिघडली. सोमवारी या घटनेची माहिती समजल्यानंतर मनसेचे अंकुश पवार, संदीप भवर, कैलास मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णालयात येऊन धडकले. त्यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत सोनार यांना घेराव घालून रुग्णांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अखेर डॉ. सोनार यांनी संबंधिताला निलंबित करण्याची तयारी दर्शविल्यानंतरही मनसेचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. ठेकेदाराला जाब विचारण्याची मागणी ते करू लागले. भद्रकाली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी परिचारक संदीप पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. डॉ. सोनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोषी कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. जखमी सोमवंशी यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी मनसेने या रुग्णालयात वारंवार आंदोलने केली आहेत. परंतु, यंदाचे त्यांचे आंदोलन हे कर्मचाऱ्याविरुद्ध कमी आणि ठेकेदाराविरुद्ध अधिक असल्याचे पहावयास मिळाले. रुग्णालयाने दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करूनही आंदोलक ठेकेदाराला जाब विचारण्याची मागणी करत होते. शिवसेना पदाधिकाऱ्याकडे असलेला हा ठेका काढून घेण्यासाठी मनसेचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.