कृषिपंपाची वीज खंडित करू नये, या मागणीसाठी शिवसेनेने महावितरण स्थानिक अधीक्षक अभियंता कार्यालयावर शुक्रवारी मोठा मोर्चा काढला. मोर्चातील शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता गर्दीत रेटारेटी होऊन गोंधळ उडाला व धक्काबुक्की झाली. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार संतोष सांबरे यांच्यासह शिवसेनेच्या जिल्ह्य़ातील प्रमुख पुढाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाणप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आमदार सांबरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, दोन्ही जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हा किसान सेनाप्रमुख एकनाथ घुगे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, जि. प.चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर आदींची मोर्चासमोर भाषणे झाली. थकीत बिलाचे निमित्त करून कृषीपंपाची वीज खंडित करणे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे वक्तयांनी सांगितले. शहरप्रमुख विष्णू पाचफुले व बाला परदेशी, जिल्हा युवासेनाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदी मोर्चात सहभागी झाले होते.