राज्य परिवहन महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी वर्षभरापूर्वीच फेसबुक पेजचा मार्ग पत्करणाऱ्या एसटी महामंडळाच्या पेजला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे पेज आवडलेल्या लोकांमध्ये तब्बल ५० देशांमधील लोकांचाही समावेश आहे. एसटी महामंडळाची माहिती, नवीन उपक्रम, अद्ययावत तिकीट दर या सर्व गोष्टी प्रवाशांपर्यंत पोहोचवणाऱ्या फेसबुक पेजवर प्रवाशांच्या तक्रारींनाही जागा आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फेसबुक पेजला इतकी लोकप्रियता मिळत असूनही एसटीचे संकेतस्थळ मात्र दुर्लक्षितच आहे. या संकेतस्थळावर माहिती अद्ययावत होत नसल्याने प्रवासी केवळ आरक्षणासाठीच संकेतस्थळाला भेट देतात.
बदलत्या काळानुसार एसटीच्या प्रसिद्धीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एसटीने आपले फेसबुक पेज सुरू केले होते. २७ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या पेजला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि विभाग नियंत्रक यांनी हे पेज पाहावे आणि या पेजवरील तक्रारींची दखल संबंधित खात्यांनी तातडीने घ्यावी, असे एसटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सुचविले होते. त्यानुसार काही दिवस या फेसबुक पेजवरील तक्रारींची दखल घेऊन त्यांचा निकाल तातडीने लावण्यात आला होता.
पेज सुरू करून एक वर्ष पूर्ण होण्याआधीच, म्हणजेच जुलै २०१४च्या अखेरीस दहा हजार लोकांनी हे पेज ‘लाइक’ केले. त्यानंतर महिनाभरात ही संख्या एक हजाराने वाढली. एसटीचे पेज आवडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९५ टक्के प्रमाण पुरुषांचे आहे. यातील ४१ टक्के लोक २५ ते ३४ या वयोगटातील आहेत. या पेजची दखल केवळ राज्यात वा देशातच नव्हे तर परदेशांतही घेतली गेली आहे. संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, ब्रिटन अशा तब्बल ५० देशांमधील २०० हून अधिक लोकांनी या पेजला आपली पसंती दर्शवली आहे.
एसटीच्या फेसबुक पेजची ही घोडदौड सुरू असताना २००६पासून कार्यरत असलेल्या एसटीच्या संकेतस्थळावर मात्र अद्ययावत माहितीचा तुटवडा आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेच्या भाडय़ात झालेली वाढ असो किंवा एसटीने सुरू केलेल्या नवीन सेवांची माहिती असो, एसटीचे संकेतस्थळ अत्यंत संथ असल्याचा प्रवाशांचा सार्वत्रिक अनुभव आहे. या संकेतस्थळाच्या सुधारणेसाठी एसटी काय करणार, याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2014 रोजी प्रकाशित
एसटीच्या फेसबुक पेजला अकरा हजारांची पसंतीची मोहोर
राज्य परिवहन महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी वर्षभरापूर्वीच फेसबुक पेजचा मार्ग पत्करणाऱ्या एसटी महामंडळाच्या पेजला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

First published on: 12-09-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eleven thousands likes to msrtc facebook page