स्टेट बँकेच्या रोखपालाने नजरचुकीने दिलेली तब्बल साडेतेरा लाखांची रोकड परत करून येथील किसान युनियन पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केली. या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
किसान युनियन पतसंस्थेचे सर्व व्यवहार स्टेट बँकेच्या शाखेत असून या संस्थेस शनिवारी दीड लाख रुपयांची आवश्यकता भासल्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवाजी मगर यांनी कर्मचारी संतोष सोबले यांच्याकडे या रकमेचा चेक देऊन बँकेतून पैसे आणण्यासाठी पाठविले. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बँकेत मोठी गर्दी होती. या गर्दीमुळेच बँकेच्या रोखपाल उषा भारद्वाज यांचा गोंधळ झाला. त्यांनी घाईत हा पंधरा लाखांचा धनादेश समजून तेवढे पैसे सोबले यांना दिले. त्यांनी धनादेश पाहिला नव्हता, ते हे पैसे घेऊन तसेच संस्थेत गेले.
दीड लाखांऐवजी पंधरा लाख रुपये पाहिल्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक मगर हेही चक्रवून गेले. सर्व रक्कम घेऊन ते स्वत: तसेच स्टेट बँकेच्या शाखेत गेले. तेथे बँकेचे व्यवस्थापक संभाजी पाटील यांची भेट घेऊन संस्थेने नेमक्या किती रकमेचा धनादेश दिला आहे याची खात्री केल्यानंतर मगर व भिसे यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक पाटील यांना झालेला प्रकार सांगितला. तोपर्यंत रोखपाल भारद्वाज यांना या प्रकाराची कल्पनाही नव्हती. पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पैसे देण्याचे त्यांचे काम सुरू होते. अखेर ते काम काही काळ थांबवून त्यांना शाखाधिकाऱ्यांच्या दालनात बोलवून झालेला प्रकार सांगितल्यानंतर भारद्वाज अक्षरश: गर्भगळीत झाल्या. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. परंतु शाखाधिकारी पाटील यांनी जास्त गेलेली साडेतेरा लाखांची रक्कम पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परत आणली असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा जीव भांडय़ात पडला. या कर्मचाऱ्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्ददेखील नाहीत असे सांगत भारद्वाज यांनी या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.