गायक मिकासिंग याच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून ५०० ते दीड हजार रुपयांचे शुल्क आकारल्याने वादात सापडलेल्या ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया’ने विद्याथी संघटनांच्या दट्टय़ानंतर आता घूमजाव करीत कार्यक्रम पूर्णपणे मोफत दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयाच्या ‘फ्यूजन’ या तंत्र-सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने मिकासिंगच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
महाविद्यालयाच्या फ्यूजन या महोत्सवाचे आयोजन २८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. आपल्या चाळ्यांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या मिकासिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन यात करण्यात आले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांकडून सक्तीने ५०० ते १५०० रुपयांपर्यंतचे शुल्क वसूल करण्यात येत होते. या शिवाय बाहेरील व्यक्तींनादेखील तिकीट घेऊन कार्यक्रम खुला ठेवण्यात आला होता.
‘मिकासिंग आपल्या चाळ्यांमुळे सतत चर्चेत असतो. अशा वादग्रस्त गायकाचा कार्यक्रम आयोजित करून महाविद्यालय चुकीचा पायंडा पाडत आहे. शिवाय महाविद्यालयीन महोत्सवाच्या निमित्ताने इतके पैसे आकारून नफेखोरी करण्यात येत आहे,’ अशी तक्रार ‘प्रहार विद्यार्थी संघटने’चे अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी केली होती. संघटनेने तक्रारीचे पत्र कुलगुरूंनाही लिहिले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतही काही सदस्यांनी या प्रकाराबद्दल टीका करून या प्रकारांवर बंदी घालण्याची मागणी केली. या सर्व वादामुळे आता महाविद्यालयाने हा कार्यक्रम मोफत दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेने तिकिटाचे दर जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्ष तिकीटविक्री सुरू झाली नव्हती. संघटनेने आरडाओरड केल्यामुळे महाविद्यालयाला तिकीटविक्री करताच आली नाही. या सर्व गोंधळामुळे आता महाविद्यालयाने कार्यक्रमच मोफत झाल्याने विद्यार्थीही खूष आहेत.