दिवाळीच्या दिवसात फटाके फोडताना प्रत्येकानेच पर्यावरण आणि प्रदूषणासोबत स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विविध पर्यावरणवादी संघटनासह वैद्यकीय क्षेत्राकडून केले जात असताना दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात भारतामध्ये जगामध्ये ५ लाख लोक केवळ फटाक्यांमुळे आंधळे होत असतात. यातील ५० मुले फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या जखमांपायी दृष्टीहीन होत असतात. भारतामध्ये जवळपास दरवर्षी ५ हजार लोक फटाक्यांमुळे अंध होत असतात.
दिवाळी हा सण दिव्यांचा, जीवनात प्रकाश निर्माण करणारा आहे. त्यामुळे केवळ भारतामध्ये नाही तर जगात फराळ्याचा आस्वाद घेताना फटाके फोडून पारंपारिकरित्या हा सण साजरा केला जातो. विशेषत लहान मुले या दिवाळीच्या सणांची तर उत्सुकतेने वाट पहात असतात. दिवाळीच्या दिवसात फटाक्याची शंभर कोटीच्यावर उलाढाल होत असली तरी फटाक्यांमुळे धडधाकट मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होत असते. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान म्हणाले, फटाक्यांमध्ये चारकोल, गंधक, नायट्रेट, परफ्लोरेट आधी घटक असून ते शरीरासाठी अतिशय घातक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. फटाक्याच्या जिवीत व निर्जीव अशा दोन्हींवर दुष्परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी फटाके फोडले जातात त्या ठिकाणचे तापमान वाढत असल्यामुळे धूर, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायू आणि सामाजिक प्रदूषण वाढत असते.
दरवर्षी फटाक्यामुळे बाधित होणाऱ्या व्यक्तीपैकी ६० टक्के हे २० वर्षांखालील असतात आणि ८० टक्के पुरूष असतात. फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त बाधा होत असते. दिवाळीत वेगवेगळे आवाजाचे आणि शोभिवंत फटाके असले तरी त्यातील अनार ६० टक्के सुतळी बॉम्ब ३० टक्के, चक्र किंवा रॉकेट १० टक्के आणि इतर १० टक्के फटाके डोळ्यांना इजा करणारे असतात. उत्साहाच्या भरात अनेकदा फोडताना निष्काळजीपणा आपल्याला भोवतो. विझलेला फटाका पुन्हा फोडणे, घरी तयार केलेले फटाके, प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या माहितीचा अभाव, पालकांच्या मार्गदर्शनाचा अभाव, फटाक्यांचा अभाव, फटाक्यांपासून सुरक्षित अंतरावर नसणे, मोकळ्या जागेत फटाके न फोडता रस्त्यावर फोडणे हे सर्व निष्काळजीपणाची लक्षणे आहेत असेही डॉ. मदान म्हणाले.
डोळ्याला इजा झाल्यानंतर घ्यावयाची काळजी
डोळे चोळू नये, चोळल्यास डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यातील फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे डोळा खराब होऊ शकतो.
पाण्याने डोळा धुवू नये, तसे केल्यास जंतु संसर्ग वाढू शकतो.
डोळ्यामध्ये मलम टाकू नये.
इजा झाल्यास त्वरित जवळच्या नेत्रतज्ज्ञाना सल्ला घ्यावा
प्रतिबंधात्मक उपाययोजना
* मुलांनी पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे.
* मोकळ्या जागेत फटाके फोडावे
* शक्यतो सुती कपडे परिधान करावे.
* फटाक्यापासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
फटाक्यांमुळे भारतात दरवर्षी पाच हजार लोकांना अंधत्व
दिवाळीच्या दिवसात फटाके फोडताना प्रत्येकानेच पर्यावरण आणि प्रदूषणासोबत स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विविध पर्यावरणवादी संघटनासह वैद्यकीय क्षेत्राकडून केले जात असताना दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात भारतामध्ये जगामध्ये ५ लाख लोक केवळ फटाक्यांमुळे आंधळे होत असतात.

First published on: 13-11-2012 at 03:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every year five thousand people gets blindness because of firecrackers