माळशिरस तालुक्यातील बोंडले येथे पंढरीनाथ दशरथ जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने उजनी कालव्याचे पाणी गेल्या तीन महिन्यांपासून न आल्याने व शेतातील बोअर आटल्याने पिके कशी जगवायची आणि लोकांची कर्जे कशी फेडायची, याचा धसका घेत आत्महत्येचा मार्ग पत्करला. विष प्राशन करून त्याने मृत्यूला कवटाळले. सोलापूर जिल्ह्य़ात पाणीटंचाई प्रचंड प्रमाणात भेडसावत असताना त्याचा पंढरीनाथ जाधव हा पहिला बळी ठरला आहे.
मृत पंढरीनाथ जाधव यांची बोंडले येथे सव्वादोन एकर बागायत शेती आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह वस्तीवर राहत होते. मुलगा बळीराम (वय १७) हा ऊस तोडण्यासाठी गेला होता, तर दुसरा मुलगा राजाराम (वय १४) व मुलगी रुक्मिणी (वय १५) शाळेला गेले होते. तर पत्नी हिराबाई (वय ३७) शेतात होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पंढरीनाथ जाधव यांनी घरात विषप्राशन केल्याचे दिसून आले. शाळेतून परत आलेला मुलगा राजाराम याने हा प्रकार पाहताच शेजारच्या शेतकऱ्यांना व आईला बोलावून आणले. नंतर पंढरीनाथ यांना औषधोपचारासाठी अकलूज येथे नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात जाधव कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पंढरीनाथ जाधव यांनी ऊस पीक जोपासण्यासाठी ९० हजारांची रक्कम हातउसने घेतली होती. तसेच कृष्णा वैनगंगा ग्रामीण बँकेकडून ५८ हजारांचे कर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी २० हजारांची रक्कम त्यांनी घेतली होती. उजनीचे पाणी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कालव्याला न आल्याने जाधव यांची शेती धोक्यात आली होती.  त्यातच शेतातील पाण्याचा बोअरही आटल्याने उसाचे पीक कसे जगवायचे, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न आ वासून उभा राहिला. या काळजीतच वडिलांनी आत्महत्या केल्याचे शाळकरी मुलगा राजाराम याने सांगितले.
दरम्यान, पाण्यासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समजताच माळशिरसचे आमदार हणमंत डोळस यांनी बोंडले येथे धाव घेऊन दुर्दैवी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदुभाऊ खोत यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेतली.
या घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून यासंदर्भात माळशिरसच्या तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.