कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस पक्षाला दिलेला पाठिंबा आणि त्या बदल्यात सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसने स्वीकृत सदस्याच्या एका जागेसाठी स्वाभिमानीला दिलेला पाठिंबा या मुद्यावरून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी यांची राजकीय गोची करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या मुद्यावरून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी खासदार शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.     
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकाच्या जागा वाटपात सत्तारूढ काँग्रेसने स्वाभिमानी आघाडीच्या एका जागेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेतली होती. त्याचा पैरा महापालिकेत फेडला आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी केलेल्या मदतीची कबुली दिली आहे. त्यावर खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला केलेल्या सहकार्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसने आम्हाला मदत केली असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र शेट्टी यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचे नमूद करून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये परस्परांना सहकार्य करण्याचा छुपा अजेंडा लपला असल्याची टीका शुक्रवारी केली. शेट्टी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीला दोन वेळा लेखी पाठिंबा देऊन आपली भूमिका अधोरेखीत केली असल्याचे कोले यांनी म्हटले आहे. या टीकाटिपणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटना यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.