महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या रमाई आवास योजनेंतर्गत पात्र असलेल्या ४ लाभार्थीना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रत्येकी ६६ हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
बाजीराव मुक्ताजी, प्रमोद शामराव मिरपगार, जनाबाई शामराव कांबळे, कंथाबाई बाबूराव कांबळे या लाभार्थींना हे धनादेश मिळाले. यापूर्वी १३ लाभार्थीना पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्यात आले आहे. महापौरांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक शिवाजी लोंढे, संभाजी कदम, माजी नगरसेवक अनिल शिंदे, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, सहायक नगररचनाकार बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब कोतकर, रणजित परदेशी, दयानंद मोरे, भास्कर घोडके, बाबू चोरडिया आदी उपस्थित होते. या योजनेंतर्गत एकूण १७ लाभार्थीच्या घराची कामे सुरू आहेत. मनपाकडे अनुदानासाठी आलेल्या अर्जाचे सर्वेक्षण सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्याबाबत त्यांना कळवण्यात आले आहे. तसेच यासंबंधी योजनेतच असलेल्या काही जाचक नियम व अटींच्या शिथिलतेबाबत सरकार स्तरावर प्रयत्न करण्यात येत, आहे असे महापौर श्रीमती शिंदे यांनी सांगितले.