कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अनधिकृत फेरीवाले हटाव पथकात गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या सुमारे १०० ते १५० कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने अन्य विभागांमध्ये बदल्या केल्या आहेत. फेरीवाले, पदपथावरील दुकानदार यांच्याकडून हे फेरीवाले हप्ते वसुली करून त्यांना रस्त्यावर बसण्यास प्रवृत्त करीत आहेत, अशी टीका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून करण्यात आली होती.  
विशेष म्हणजे फेरीवाला हटाव पथकातील अनेक कर्मचाऱ्यांनी स्वत:च फेरीवाल्यांच्या संगनमताने फेरीवाले होऊन कल्याण-डोंबिवलीत दुकाने सुरू केली होती.  सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून टीका केल्याने प्रशासनाने सातही प्रभागांमधील वर्षांनुवर्षे एकाच जागी व फेरीवाला हटाव पथकात ठाण मांडलेल्या सुमारे १०० ते १५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवीन कर्मचाऱ्यांचे फेरीवाल्यांशी कोणतेही लागेबांधे नसल्याने फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई तत्पर होईल, असा विश्वास नगरसेवकांना वाटत आहे. सातही प्रभागांच्या निष्क्रिय प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेच्या भोवऱ्यात असलेल्या अनिल लाड या अधिकाऱ्याकडे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुखपद आयुक्तांनी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात हेच लाड वाद्ग्रस्त ठरले आहेत.
बदली जाण्यास नकार
वर्षांनुवर्षे फेरीवाले, दुकानदारांबरोबर असलेले ‘स्नेहाचे’ संबंध तोडणे अनेक कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. त्यांनी प्रशासनाने काढलेले बदलीचे आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. बहुतेक कर्मचाऱ्यांच्या लेखी फेरीवाला ‘लक्ष्मी’समान आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर बदल्या करण्यात आल्याने फेरीवाल्यांकडून दिवाळीची भेट जुन्या की नव्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारायची यावरून कर्मचाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू आहे. त्यामुळेही कोणीही कर्मचारी बदली आदेश स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. ‘ग’ प्रभागात सध्या फेरीवाले हटाव पथकातील कामगार बदल्या झाल्याने ते फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कामत मेडिकल, रॉथ रोड, पाटकर रस्ता, नेहरू रस्ता परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे.
प्रशासन ठप्प
पालिकेच्या डोंबिवली विभागात कर विभागात प्रवीण गंभीरराव व रमाकांत जोशी हे कर्मचारी अनेक वर्षांपासून आहेत. डोंबिवली विभागातील कर वसुली करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याच बदल्या करण्यात आल्याने डोंबिवली विभागातील कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण कोण करणार असा प्रश्न कर विभागाच्या वरिष्ठांना पडला आहे. त्यांच्या ह आणि ब प्रभागात बदल्या केल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेत गेल्या तीन वर्षांपासून फेरीवाल्यांना प्रभावीपणे हटविण्याचे काम बाजीराव अहिर व त्यांच्या पथकाने केले. या अहिर यांची डोंबिवली पूर्व भागात पथक प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. तर पश्चिमेतील ह प्रभागात त्यांना कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या पथकातील अन्य कामगारांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. निष्ठावान कर्मचारी नसतील तर काम करणे अवघड जाते असे पथकातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ठाणमांडय़ा कर्मचाऱ्यांबरोबर प्रशासनाने काही चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बदल्या करून बळी घेतला असल्याची चर्चा पालिकेत आहे.