तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास गुरूवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने सुरूवात होत आहे. वाढत्या महागाईची पर्वा न करता आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या माध्यमातून दिपोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने आणि त्यातच कांदा, डाळिंब यांना बऱ्यापैकी भाव असल्याने उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदात जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत असतांना शहरांमध्येही कामगारवर्ग तसेच शासकीय नोकरदारांच्या हाती वेळेवर बोनस पडल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेतील खरेदी-विक्रीवर झाला आहे. या सर्वाचा एकत्रित उत्साह यंदाच्या दीपोत्सवावर पहावयास मिळत आहे. गत वर्षी या सणावर मंदीचे सावट होते. पण, यंदा महागाईची ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताच परिणाम न झाल्याने व्यावसायिकांनी ही दिवाळी आनंदाची, सुख व समाधानाची जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबीजसाठी अजून अवधी असतानाही बाजारपेठांमधील खरेदीचा माहौल कायम आहे. वसुबारसनंतर लक्ष्मीपूजन व भाऊबीजच्या स्वागतासाठी व्यापारीवर्ग सज्ज झाला आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मीपूजनाचे महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण. तर घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. केरसुणी, पणत्यांची खरेदी करण्यासाठी बुधवारी ग्राहकांची गर्दी झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2013 रोजी प्रकाशित
‘वसुबारस’ ने चैतन्यपर्वाची सुरूवात
तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास गुरूवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने सुरूवात होत आहे.
First published on: 31-10-2013 at 07:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival start with the cow calf adoration