येथील क्रेडिट कॅपिटल पतसंस्थेच्या कार्यालय जळीत प्रकरणात आग लावण्यात आल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याच्या अहवालात म्हटले आहे. तेव्हा हा गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय रद्द करून फेरचौकशी करावी, असा निर्णय शासकीय जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कृती समितीची बैठक निवासी उप जिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस अडचणीतील बँका व पतसंस्थांच्या सर्व प्रतिनिधींनी प्रत्येक बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. मुख्य लिपीक भूषण जाधव यांनी संस्थानिहाय कर्ज वसुली व ठेवी वाटपाचा अहवाल सादर केला. अडचणीतील सर्व पतसंस्थांमधील बडय़ा कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा नोंदविण्यात यावेत, कपालेश्वर पतसंस्थेच्या जप्त मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द करावेत, मालमत्तांची सद्यस्थितीची तपासणी करून जप्तीचे फलक लावण्यात यावेत, आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, सहाय्यक निबंधक मनिषा खैरनार, नाशिक प्रांत विनय गोसावी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी एन. एफ. होले यांच्यासह संस्थांचे अवसायक, प्रशासक आदींनी भाग घेतला.