आक्रमक आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हे पीक अधिक पाण्याचे असल्याने ठिबक सिंचनाशिवाय असणाऱ्या ऊस पिकाला पेटवून देण्याचे आंदोलन हाती घ्या, असा आदेश शुक्रवारी देण्यात आला. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी यांनी असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
हिंगोली येथे ब. ल. तामसकर या योद्धा कार्यकर्त्यांच्या सत्कारानिमित्त ते बोलत होते. जगाच्या पाठीवर जेथे उसाचे पीक घेतले जाते, तेथे तेथे केवळ पावसाचे पाणी वापरले जाते. केवळ भारतातच कालव्याने उसाला पाणी दिले जाते. जेथे पाण्याचे आधीच दुर्भिक्ष्य आहे, तेथे ऊस घेणे चुकीचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीशिवाय उसाची शेती करणाऱ्यांचा ऊस पेटवून द्यावा. हे आंदोलन हाती घेण्याची जबाबदारी ब. ल. तामसकर आणि नारायण जाधव यांच्यावर सोपवत असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे त्याला दुष्काळात खडी फोडण्याच्या कामावर जाण्याची वेळ येते. शेतमालाला योग्य किंमत मिळाली तर त्याच्यावर ही वेळ येणार नाही.
शरद जोशी यांनी औरंगाबाद  तालुक्यातील आडगाव येथून दुष्काळ पाहणी दौऱ्याला प्रारंभ केला. जालन्यातील काही गावांना भेटी दिल्यानंतर व मराठवाडय़ातील पूर्ण दौरा झाल्यानंतर दुष्काळाबाबतचे विश्लेषण करू, असे गुरुवारी त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पीक रचना बदलण्यासाठी आंदोलन केले जाईल, असे सुचविण्यात आले होते. आज हिंगोली येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आंदोलनाचा कार्यक्रम ठरवून दिला.
हिंगोली येथील बाजार समितीच्या प्रांगणात ब. ल. तामसकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच दुष्काळ परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर नानासाहेब गोरे, भास्करराव बोरावके, डॉ. व. द. भाले, सरोजनी काशिकर, वामनराव चटप, अमर हबीब, गुणवंतराव हंगरगेकर आदींची उपस्थिती होती. मराठवाडय़ाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ब.लं.च्या कार्याची दखल घेतल्याशिवाय तो पूर्ण होऊ शकणार नाही. आणीबाणी, नामांतराचे आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन याचे ब. ल. साक्षात उदाहरण असल्याचे जोशी यांनी सांगितले.