जिममध्ये व्यायाम करीत असलेल्या एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यावर प्रतिस्पर्धी टोळीने गोळीबार केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील कन्हान-कांद्री येथे सोमवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने त्या परिसरात दहशत निर्माण झाली. अस्तित्वाची लढाई तसेच परस्पर वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती आहे.
मोहनीश रेड्डी हे गंभीर जखमीचे नाव असून त्याला कामठी यथील रॉय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कन्हान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मोहनीश रेड्डी आज नित्याप्रमाणे कन्हान-कांद्री येथील ‘विल जिम’मध्ये सकाळी व्यायाम करीत होता. सव्वादहा वाजताच्या सुमारास नऊजण तेथे आले. त्यापैकी तिघे आत गेले. त्यांना पाहताच मोहनीश उठून उभा राहिला. आरोपीजवळ आल्यानंतर त्यांची बाचाबाची झाली. आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. मोहनीशने व्यायामाच्या एका उपकरणाच्या लोखंडी रॉडने प्रतिकार केला. ते पाहून तिन्ही आरोपींनी देशी कट्टे काढले. त्यापैकी एकाने मोहनीशच्या दिशेने गोळीबार केला. त्यापैकी दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या. तिसरी गोळी त्याच्या पाठीत शिरली आणि मोहनीश खाली कोसळला. ते पाहताच आरोपी तेथून पळून गेले. ही घटना घडली तेव्हा जिममध्ये दोन-तीन लोक होते. ते आणि तेथील कर्मचारी तेथून पळाले. काही वेळातच ही घटना कर्णोपकर्णी झाली. कन्हानमधील दुकाने पटापट बंद झाली.  
कुणीतरी पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्यासह कन्हान पोलीस व त्या पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे, पोलीस निरीक्षक साहेबराव जाधव यांच्यासह कामठी व मौदा पोलीस तेथे आले. मोहनीशच्या पाठीतून रक्तस्राव सुरू होता. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनीशला तातडीने कामठीच्या रॉय रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपअधीक्षक रामलखन यादव राखीव ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या घटनेने तेथे तणाव निर्माण झाला. कन्हान परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला. दुपारनंतर दुकाने उघडली. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा आत तिघे तर इतर बाहेर होते. मोहनीशने सांगितलेल्या माहितीवरून पोलिसांनी दुपारी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली.
अस्तित्वाची लढाई तसेच परस्पर वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती आहे. मोहनीशविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहनीश एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. जानेवारी २०१२ मध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही वर्षांत कन्हान परिसरात या दोन गटाच्या  वैमनस्यातून काही गंभीर घटना घडल्या आहेत, अशी पोलिसांची माहिती आहे. यापूर्वी तसेच आजच्या घटनेतील आरोपीसुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून दोघे एका पुढाऱ्याचे जवळचे नातेवाईक आहेत. पोलीस या माहितीची शहानिशा करीत आहेत.