काटोल मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारावर अनोळखी आरोपींनी गोळीबार केला. सुदैवाने उमेदवार बचावला असला तरी निवडणूक काळातील ही पहिलीच हिंसक घटना ठरली आहे.
प्रमोद शेषराव चाफले (रा. रामनगर कोंढाळी) हे काटोल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तसेच कोंढाळी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. प्रत्यक्षात भाजपने आशिष देशमुख यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, प्रमोद अद्यापही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. आज सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास ते प्रचारासाठी त्यांच्या बोलेरो जीपने निघाले. ते स्वत: एकटेच जात होते. शेकापूरमधून ते कार्यकर्त्यांना सोबत घेणार होते. कोंढाळीपासून सहा किलोमीटर अंतरावरील शेकापूरकडे जात असताना एक बोलेरो जीप त्यांचा पाठलाग करीत असल्याचे जाणवले.
काही वेळातच समोरून पल्सर मोटारसायकलवर दोघेजण आले. त्यांनी चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळला होता. मोटारसायकलवर मागे बसलेल्याने चाफले यांच्या जीपवर गोळीबार केला. त्यामुळे काचा फुटल्या आणि त्या चाफले यांच्या अंगावर पडल्या. चाफले यांनी गाडी थांबवली. त्याबरोबर पल्सरवरील दोघेजण परत आले आणि एकाने त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर टेकविले. त्यांनी त्यांना जोराने ढकलले. दुसरा पुढे आला. त्यानंतर दोघांसोबत त्यांची झटापट झाली. त्या झटापटीत आरोपीच्या हातातील शस्त्र प्रमोद चाफले यांच्या गाडीत पडले. त्याबरोबर दोघे हल्लेखोर मोटारसायकलवर कोंढाळीच्या दिशेने पळून गेले. चाफले यांनी लगेचच कोंढाळी पोलीस ठाण्याला घटना कळविली. कोंढाळीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप लांबट यांच्यासह कोंढाळे पोलीस व त्यापाठोपाठ काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी येऊन पोहोचले. पोलीस अधीक्षक  डॉ. आरतीसिंह यांनी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी जीपमधील शस्त्र जप्त केले. तो देशी कट्टा (सिक्सर) असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील तीन जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राजकीय इर्शेतूनच ही घटना घडली असल्याचा आरोप प्रमोद चाफले यांनी केला. या परिसरातील सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम सुरू केले. जनतेच्या पाठिंब्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार पक्का केला. पक्षाला उमेदवारी मागितली. मात्र, ऐनवेळी आशिष देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे ठरविले. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागे घेण्याचे म्हटले होते. त्यासंबंधी विचार करीत असतानाच ही घटना घडली. हल्लेखोर नेमके कोण होते आणि कुणी हा हल्ला घडवून आणला हे सांगता येत नाही. कोंढाळीत होऊ घातलेल्या अवैध कत्तलखान्यास विरोध केला होता आणि तीन महिन्यांपूर्वी कोंढाळी बंदसाठी पुढाकार घेतला होता. तेव्हा जिवे ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या व तसे पोलिसांना सांगितले होते, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील ही पहिलीच हिंसक घटना ठरली आहे. आघाडी व महायुती तुटल्या असून चार प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत आहेत. केवळ सत्ता व मुख्यमंत्री पद पटकावण्याची स्पर्धा लागली असल्याने निवडणूक शांतता पणाला लागल्याचे हे द्योतक आहे.