उरण तालुक्यात हृदयरोगावर उपचार करणारे एकही अद्ययावत रुग्णालय नसल्याने उपचारांअभावी मागील आठवडय़ात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे उरणमधील नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना नवी मुंबई अथवा मुंबईकडे उपचारांसाठी धाव घ्यावी लागते. उरणमधील वाहतूक कोंडी व कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका नसल्याने अनेकदा अशा रुग्णांना नवी मुंबई गाठण्यापूर्वीच प्राण गमवावे लागत आहेत. अशाच प्रकारच्या घटना मागील आठवडय़ात उरणमध्ये घडल्या आहेत.
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश कडू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्याचप्रमाणे करंजा येथील नारायण म्हात्रे, बोकडवीरा येथील सुमन सुतार, भेंडखळ येथील राजेश ठाकूर यांनाही हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नवी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, नवी मुंबईत पोहचण्यापूर्वीच निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तातडीने उरणमध्ये किमान हृदयरोगावर प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता मृतांचे नातेवाईक व जनतेकडून केली जात आहे. तालुक्यात सध्या जेएनपीटी, ओ.एन.जी.सी., भारत पेट्रोलियम तसेच जेएनपीटी येथील शेकडो गोदामे निर्माण झाली आहेत. या परिसरात दररोज पन्नास ते साठ हजार कामगार कामानिमित्त ये-जा करीत असतात. त्याशिवाय उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये राहणारी जनता मोठय़ा प्रमाणावर असूनही या तालुक्यात हृदयविकारावर उपचार करण्याच्या कोणत्याही सुविधा नाहीत. याबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. लवकरात लवकर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर किमान प्राथमिक उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, तसेच रुग्णांना नवी मुंबईत हलविण्यासाठी कार्डिअ‍ॅक व्हॅनची सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.