संमेलनाध्यक्षपदी सोनाली नवांगुळ
अपंगांना दयेची भीक नको, तर संधी व प्रोत्साहनाची गरज आहे. अपंगांच्या साहित्य व कलागुणांना वाव देण्यासाठी अपंग साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्यावतीने चौथे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन २२ व २३ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्ड भागातील निसर्ग मंगल कार्यालयाच्या संत सूरदास साहित्य नगरीत हे संमेलन होईल. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरच्या युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ, तर स्वागताध्यक्षपदी उद्योजक वैकुंठ कुंभार यांची निवड झाली आहे.
संमेलनाच्या संयोजन समिती अध्यक्ष मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर असून कार्यवाहपदी शैलनी सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश छडवेलकर आहेत. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी अपंग कल्याणचे मुख्य आयुक्त प्रसन्नाकुमार पिंचा, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, राज्याचे अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव, गर्जा महाराष्ट्र या दूरचित्रवाहिनीचे अध्यक्ष अनिल महाजन, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष शिवानंद हुल्लेकर आणि अपंग साहित्यिक डॉ. सुधीर देवरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसांच्या संमेलनात ग्रंथदिंडी, निमंत्रितांचे कविसंमेलन, साहित्यविषयक परिसंवाद, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, अपंगत्वावर मात करून ठसा उमटवणाऱ्या अपंग व्यक्तींच्या प्रकट मुलाखती, खुले चर्चासत्र, असे विविध कार्यक्रम या संमेलनात आयोजित करण्यात आले आहेत. गोव्याचे संदीप मोराजकर, नवी दिल्लीचे डॉ. राम पॉल, कोलकाता येथील असिफ इकबाल, कर्नाटकातील शकुंतला परांजपे, नागपूरचे किशन शर्मा, पुण्याच्या प्रतिभा भोळे, मुंबईचे अरविंद प्रभू, जळगावचे किशोर नेवे, नाशिकचे पांडुरंग भोर, अकोल्याचे अनुराग वानरे, पुण्याच्या ज्योती जाधव, बेळगावचे दत्ता कामकर, अहमदनगर येथून शिवशाहीर विनय तनपुरे आणि पंढरपूरच्या मीनाक्षी देशपांडे आदी अपंग बंधुभगिनी संमेलनासाठी निमंत्रित आहेत.
समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बच्चू कडू, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक मुरकुटे यांच्यासह चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अपंगात्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण, साहित्यातील अपंगांचे स्थान, अपंग धोरणाची उदासीनता, अशा तीन विषयांवर निबंध स्पर्धा, तर स्वयंसिद्धतेकडे वाटचाल, अडथळाविरहित मुक्तसंचार आणि अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल, हे तीन विषय चित्रकलेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. संमेलनासाठी देशभरातून पाच हजार अपंग उपस्थित राहणार आहेत. त्यांची निवासाची व भोजनाची  विनामूल्य व्यवस्था संयोजन समितीमार्फत करण्यात आली आहे.