खारघर येथे खरेदी करण्यात आलेल्या घराची स्टँम्पडय़ूटी (मुद्रांक शुल्क) भरण्यासाठी घरमालकाने दिलेली ५ लाखांची रक्कम हडप करणाऱ्या इस्टेट एजंटला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. ही रक्कम त्याने घेतलेले कर्ज भागविण्यासाठी खर्च केल्याचे तपासात समोर आले आहे. भूपेंद्र सिंग असे या आरोपीचे नाव आहे. तो खारघर येथील राहणारा आहे. इस्टेट एजंट असून वाशीत त्याचे ऑफिस आहे. संजय सिंग यांनी खारघरमध्ये घर खरेदी केले होते. या घराची स्टँम्पडय़ूटी भरण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी भूपेंद्र याला ५ लाख १० हजार रुपये दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याने ती भरली नसल्याचे संजय सिंग यांनी स्टँम्पडय़ूटी कार्यालयात चौकशी केली असता समोर आले. या प्रकरणी संजय सिंग यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून भूपेंद्र याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक अशोक धिवरे यांनी दिली आहे. कर्जबाजारी असलेल्या भूपेंद्र याने या रकमेतून देणीदारांची देणी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.