सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात झालेल्या तीन कोटी ४९ लाखांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत परिचारक व उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यासह आजी-माजी संचालक व अधिकारी-कर्मचारी अशा ४२ जणांना जबाबदार धरून चौकशी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात तीन दिवसात म्हणणे सादर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.
दरम्यान, दूध संघात कोणताही आर्थिक भ्रष्टाचार झाला नाही,असा दावा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी केला असून भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द झाल्यास आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन कायमचे घरी बसू, असे स्पष्टीकरणही परिचारक यांनी दिले आहे.
या संदर्भात दूध संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिक गायकवाड (बार्शी) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दूध संघातील कथित गैरव्यवहाराला तोंड फोडले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार विभागाकडून या प्रकरणाची चौकशी झाली. यात चौकशी अधिकारी मोहन निंबाळकर यांनी २००४ ते २००९ या कालावधीत दूधसंघात तीन कोटी ४९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेऊन याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांसह संबंधित ४२ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.