महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे येथे १७ मे ते ५ जून या कालावधीत विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी महाराष्ट्रातून एकूण १२ हजार ५०० जागांसाठी पोलीस शिपाई भरती होणार असून त्यासाठी लेखी व शारीरिक चाचणी  इच्छुकांना द्यावी लागणार आहे. यासंदर्भात मनसेच्या करिअर विभागातर्फे जिल्ह्य़ातील बेरोजगार तरुण-तरुणींना सदर परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी तसेच लेखी व शारीरिक चाचणी परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरासाठी नावनोंदणी ठक्कर बाजारजवळील मनसेच्या राजगड कार्यालयात सकाळी १० वाजेपासून सुरू आहे. मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़गृहात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात राम खैरनार, डॉ. जी. आर. पाटील, निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवाजीराव काळोगे, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी सानप, मराठा विद्या प्रसारक समाजाचे वरिष्ठ क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, क्रीडा शिक्षक कैलास लवांड, क्रीडा मार्गदर्शक पद्माकर घुमरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास मनसेचे प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते, अतुल चांडक, आ. अ‍ॅड. उत्तम ढिकले, आ. नितीन भोसले, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित राहतील. १८ मे पासून केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी सहा ते आठ दरम्यान शारीरिक प्रशिक्षण सराव करून घेण्यात येणार असून लेखी परीक्षेचा सराव दुपारी दोन ते पाच या सत्रात सीबीएसजवळील जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीत होणार असून उद्घाटन सोहळ्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. वसंत गिते, अतुल चांडक आदींनी केले आहे.