भारतरत्न मागासवर्ग सहकारी ग्राहक संस्थेस २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्याच्या हेतूने नाशिकरोडपासून स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्री-पेड रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.
मायको कामगार नेते रघुनाथ मोहिते आणि हवालदार प्रमिला मोहिते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेले रघुनाथ मोहिते फाऊंडेशन आणि माजी खासदार हरिभाऊ महाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेले भारतरत्न मागासवर्ग सहकारी ग्राहक संस्था यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्या हस्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आले. या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि रिक्षाचालक उपस्थित होते.