मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात झालेल्या गैरप्रकरणात मानवतचे तहसीलदार एन. एस. सोनवणे, तसेच तत्कालीन तहसीलदार संगीत सानप यांच्यासह पाचजणांवर फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी पोलिसांत दाखल झाला.
मांडेवडगाव येथे केशरबाई उत्तमराव तुपसमिंद्रे यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाबाबत गावातीलच श्रीकृष्णा साहेबराव शेळके व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली होती. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून या दुकानाची गेल्या १२ सप्टेंबरला चौकशी झाली. स्वस्त धान्य दुकानाचे लेखे व्यवस्थित न ठेवणे, तसेच धान्य वितरणात गैरप्रकार झाल्याचे चौकशीत निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत पुरवठा अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला. ४ ऑक्टोबरला तुपसमिंद्रे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. गावक ऱ्यांनी परवाना निलंबित न करता तो कायमचा रद्द करावा, अशी मागणी होती. याबाबत विभागीय आयुक्तांकडून कारवाई होत नाही, असे दिसताच ज्ञानोबा साहेबराव शेळके यांनी मानवत न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली. या प्रकरणात न्यायमूर्ती एम. आर. शेख यांनी तत्कालीन संगीता सानप, तहसीलदार एन. एस. सोनवणे, स्वस्त धान्य दुकानदार केशरबाई तुपसमिंद्रे, त्यांचे पती उत्तम तुपसमिंद्रे, अंगणवाडी ताई उषा भीमराव तुपसमिंद्रे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तक्रारदार शेळके यांच्या वतीने अ‍ॅड. बळीराम तारे व अ‍ॅड. गणेश धोपटे यांनी काम पाहिले. मानवत पोलीस ठाण्यात या पाचजणांवर  जीवनाश्यक वस्तूंच्या अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.