डॉ. हेडगेवार रुग्णालयातील ५० कर्मचाऱ्यांना किमान वेतन कराराचे सर्व लाभ देण्यात यावेत, असा निकाल औद्योगिक न्यायालयाने दिला. किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार भारतीय मजदूर संघाच्या वतीने औद्योगिक न्यायालयात करण्यात आली होती. डॉ. हेडगेवार रुग्णालयात भारतीय मजदूर संघाची शाखा स्थापन करण्यात आल्यानंतर रुग्णालयातील प्रशासनाने अंतर्गत कर्मचारी संघटनेबरोबर वेतन करार केले. भारतीय मजदूर संघाच्या ५० सभासदांना या कराराचा लाभ होऊ शकला नव्हता. या अनुषंगाने किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार भारतीय मजदूर संघाच्या सभासद कामगारांनी कामगार उपायुक्तांकडे केली होती. या तक्रारीनंतर रुग्णालयाने कामगारांना किमान वेतन फरकापोटी ७९ हजार रुपये दिले. त्यानंतर कामगारांनी वेतन कराराच्या लाभाची मागणी केली. ती मान्य न केल्याने ५० कामगारांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. या कर्मचाऱ्यांना वेतन कराराचा लाभ पूर्वलक्ष्यी प्रभावाने द्यावा, ही मागणी मान्य करण्यात आली. कामगारांच्या बाजूने अ‍ॅड. व्ही. डी. पाटील, तर व्यवस्थापनाच्या वतीने अ‍ॅड. रवींद्र घुगे यांनी काम पाहिले.