हिंदूी चित्रपटसृष्टीशी स्पर्धा करत मराठी मराठी चित्रपट टिकविण्याचे आव्हान सर्व संबंधितानी पेलतानाच समस्त मराठी जनांनी मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी गुरुवारी माहीम येथे केले.
सिटीलाईट चित्रपटगृहाने आयोजित केलेल्या ‘सिटीलाईट चित्रपट महोत्सवा’चे उद्घाटन हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल राजदत्त यांचा निहलानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सिटीलाईट चित्रपटगृहाचे अध्यक्ष प्रसाद ठाकूर, तरुण भारत (बेळगाव)चे संपादक किरण ठाकूर, माजी नगरपाल किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, महोत्सवाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समीक्षक सुधीर नांदगावकर, ‘अनवट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे  या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी चित्रपट आणि संस्कृती टिकावी, वाढावी यासाठी एका चित्रपटगृहाने आयोजित केलेला हा महोत्सव निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून ‘बेळगाव तरुण भारत’चे संस्थापक बाबूराव ठाकूर, त्यांचे सुपुत्र किरण आणि नातू प्रसाद या तीन पिढय़ा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी एका ध्येयाने झपाटून लढताहेत ही अभिमानाची आणि दुर्मिळ बाब असल्याचेही  राजदत्त यांनी सांगितले.
किरण शांताराम, किरण ठाकूर, विजय कोंडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद ठाकूर तर सूत्रसंचालन पूर्वी भावे यांनी केले. सई ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. चित्रपट महोत्सव आयोजनात महत्वाचा सहभाग असलेल्या व्यक्ती आणि प्रायोजकांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनवट’ या चित्रपटाचा प्रिमियर सादर झाला. अत्याधुनिक ‘फोर के’ या तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.