तळागाळातील कार्यकर्त्यांला नावासह ओळखणारे, प्रत्येकाशी कौटुंबिक स्नेहसंबंध राखणारे, भोजनाच्या निमित्ताने गप्पांचा फड रंगविणारे, कोणाच्याही मदतीसाठी स्वत:हून पुढाकार घेणारे, कोणाची समजूत काढण्यासाठी थेट नतमस्तक होण्याची भूमिका घेणारे.. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित अशा नानाविध आठवणी अन् ऋणानुबंधांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी उजाळा दिला.
दिल्ली येथे अपघातात मुंडे यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर धक्का बसलेले भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते एन. डी. पटेल रस्त्यावरील पक्ष कार्यालयात जमा झाले. अनेकांचा दूरचित्रवाणीवर दाखविल्या जाणाऱ्या वृत्तावर विश्वास बसला नव्हता. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना काय बोलावे हे देखील सूचत नव्हते. श्रद्धांजली अर्पण करताना काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाशिकशी संबंधित भूतकाळातील राजकीय व व्यक्तिगत आठवणींना उजाळा दिला. अश्रूंचा बांध फुटल्याने अनेकांना बोलणे अवघड झाले. मनसेचे आ. वसंत गीते, महापौर अॅड. यतिन वाघ, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी भाजपच्या कार्यालयात जाऊन मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश चिटणीस सीमा हिरे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांचे नाशिकशी प्रदीर्घ काळापासूनचे संबंध. आणीबाणीच्या काळात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बंडोपंत जोशी हे जवळपास १७ महिने नाशिकरोडच्या कारागृहात होते. या ठिकाणीच महाजन आणि मुंडे यांच्याशी जोशी यांचे निकटचे संबंध निर्माण झाले. कारागृहात होणाऱ्या अंतर्गत क्रीडा स्पर्धेत बंडोपंत जोशी यांचा कबड्डीचा खेळ पाहून महाजन व मुंडे दोघे चांगलेच प्रभावित झाले होते. पुढील काळात हे संबंध इतके दृढ झाले की, जेव्हा कधी मुंडे नाशिकला येत तेव्हा केवळ जोशी यांच्या घरातून भोजनाचा डबा ते आवर्जून मागवून घेत असत. बंडोपंत जोशी यांचे निधन झाले तेव्हा मुंडे काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. त्यांनी तेथून जोशी कुटुंबीयांना दूरध्वनी करून सांत्वन केले, अशी आठवण बंडोपंत जोशी यांचे पुत्र व भाजपचे पदाधिकारी देवदत्त जोशी यांनी नमूद केली.
१९९५ मधील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची गोष्ट. भाजपचे तत्कालीन आमदार गणपतराव काठे पुन्हा तिकीट मिळावे म्हणून रुसून बसले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी खुद्द गोपीनाथराव नाशिकला आले. दहा वाजता काठे यांच्यासोबत सुरू झालेली बैठक तीन तास चालली. त्या वेळी बंडोपंत जोशी, बिरदीचंद नहार, नितीनभाई जोशी, डॉ. डी. एस. आहेर उपस्थित होते. गोपीनाथरावांनी काठे यांची बरीच समजूत काढली. पण, प्रारंभी ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर गोपीनाथरावांनी डॉ. आहेर यांनी विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी केली आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीत कोणताही अवरोध नको म्हणून ‘मी आपल्या पाया पडतो’ असे थेट सांगून काठेंना माघार घ्यायला लावली. हे उदाहरण देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथरावांचे नेतृत्व होते, असे डॉ. डी. एस. आहेर यांनी नमूद केले. त्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय झाला. राज्याच्या आरोग्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. तेव्हादेखील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि संदर्भ सेवा रुग्णालय नाशिकला आणण्यात गोपीनाथरावांनी पाठबळ दिले. त्यांच्या भक्कम आधारामुळे आरोग्य विद्यापीठ व संदर्भ सेवा रुग्णालय नाशिकमध्ये आकाराला येऊ शकले, असेही डॉ. आहेर यांनी सांगितले.
प्रमोद महाजन यांच्या अकस्मात निधनानंतर उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांच्या वॉर्डात गंगापूर रस्त्यावरील उद्यानास प्रमोद महाजन यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुशोभीकरणानंतर या उद्यानाचे उद्घाटन गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले होते. त्या सोहळ्यात मुंडे यांनी ‘आज या उद्यानाचे उद्घाटन आपण करत असलो तरी आमची घरची बाग मात्र उजाड झाली,’ असे सांगितल्यावर उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, अशी आठवण भाजपचे नेते प्रा. सुहास फरांदे यांनी सांगितली.
भाजपचे माजी शहराध्यक्ष विजय साने यांचे मुंडे यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध होते. १९८० मध्ये मुंडे हे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यापुढील वर्षांपासून म्हणजे १९८१ पासून आपण त्यांच्यासोबत काम करत होतो. तळागाळातील शेवटच्या कार्यकर्त्यांला नावानिशी ओळखण्याची त्यांची अभूतपूर्व अशी शैली होती. पक्षाचा मोठा पदाधिकारी असो वा सामान्य कार्यकर्ता प्रत्येकाशी ते समान पद्धतीने वागायचे. अपघातात जखमी झालेली माझी मुलगी नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर मुंडे यांनी मुंबईहून डॉक्टरांचे पथक तिच्या तपासणीसाठी पाठविले. माणसे जपण्याचे त्यांचे कसब वेगळेच होते. नाशिकला आल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी जाणार, हॉटेलऐवजी घरगुती जेवणाची व्यवस्था करण्याचा आग्रह धरणार, भोजन करताना कार्यकर्त्यांशी मनसोक्त गप्पा मारणार, सर्वाची आपुलकीने विचापूस करणार, असा त्यांचा स्वभाव असल्याचे साने यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्य भाजपच्या महिलांचे शिष्टमंडळ मुंडे यांच्या भेटीसाठी गेले होते. विधानसभा निवडणुकीत महिलांना २५ टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर केली. तेव्हा कोण कोण विधानसभा लढणार असे विचारून त्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ अकस्मात निघून गेल्याची भावना सीमा हिरे यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2014 रोजी प्रकाशित
.. अन् कंठ दाटून आला
तळागाळातील कार्यकर्त्यांला नावासह ओळखणारे, प्रत्येकाशी कौटुंबिक स्नेहसंबंध राखणारे, भोजनाच्या निमित्ताने गप्पांचा फड रंगविणारे, कोणाच्याही मदतीसाठी स्वत:हून पुढाकार घेणारे, कोणाची समजूत काढण्यासाठी थेट नतमस्तक होण्याची भूमिका घेणारे..
First published on: 04-06-2014 at 08:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath mundes death modi loses crucial minister bjp