सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ म्हणून लौकिक असलेल्या येथील गुंफण अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पध्रेत प्रा. अरुण मड (अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी लिहिलेल्या ‘गोष्ट उंदीरवाडीची’ या कथेस प्रथम क्रमांक मिळाला.
मराठी साहित्यात विनोदी साहित्याच्या बाबतीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नवोदित विनोदी लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पध्रेचे हे दहावे वर्ष असून, राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची विनोदी कथा स्पर्धा असा या उपक्रमास लौकिक प्राप्त झाला आहे. विकास धुळेकर, अंकुश पवार, केशव चव्हाण या तज्ज्ञ समितीने कथांचे परीक्षण करून यंदाचा निकाल जाहीर केला.
या स्पर्धेत मोहन रावळ (पुणे) यांची ‘लग्नाला चला’ ही कथा द्वितीय, वीरेंद्र पतकी यशवंतनगर (ता. माळशिरस , जि. सोलापूर) यांची ‘मतदान’ ही कथा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. रमाकांत कुलकर्णी (नाशिक) यांच्या ‘केवडा’ व सम्राट घोटगे (अमरावती) यांच्या ‘उधळला वारू’ कथांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.